आराखड्यावर ओरखडे
By Admin | Updated: October 12, 2015 00:37 IST2015-10-11T22:20:08+5:302015-10-12T00:37:14+5:30
निव्वळ घोषणाबाजी : पर्यटन विकास कागदावरच!

आराखड्यावर ओरखडे
रहिम दलाल- रत्नागिरी --रत्नागिरीच्या पर्यटन विकासाबाबत नेहमीच मोठमोठ्या योजना समोर ठेवल्या जात आहेत. आराखडाही आखण्यात आला आहे. मात्र, रत्नागिरीतील किनारपट्टीवर पर्यटनासाठी आवश्यक वातावरण असतानाही सुविधांचा पत्ता नाही. पर्यटकांना मोहिनी घालणारा भाट्येसारखा किनारा अंधारात आहे. त्यामुळे पर्यटन विकास की निव्वळ घोषणाबाजी, असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी राजकीय व शासन स्तरावर इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांच्या ते कधी लक्षात येईल, असा प्रश्न भाट्ये खाडीवरील पूल आणि त्याला लागूनच असलेल्या भाट्ये सुरुबन समोरील किनारपट्टीच्या रात्रीच्या भयाण स्थितीवरुन दिसून येते आहे.रत्नागिरी शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले प्रथम भाट्ये आणि मांडवी किनाऱ्याकडे वळतात. जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी पर्यटन महोत्सवावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. भाट्ये किनाऱ्यावर आणि गो. जो. महाविद्यालयाच्या मैदानावर पर्यटकांसाठी हा महोत्सव भरविण्यात आला होता. हजारो लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. मात्र, हा झगमगाट पर्यटकांना दाखवताना भाट्ये पूल आणि सुरुबन परिसरात पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही.
भाट्ये पुलावर रात्रीच्या वेळी भयाण अंधार असतो. भाट्ये पुलावर पूर्वी विजेचा लखलखाट होता. त्यामुळे स्थानिक लोकही रात्रीच्या वेळी या शांत व निसर्गरम्य वातावरणामध्ये फेरफटका मारण्यासाठी येत असत. मात्र, समाजकंटकांनी या पुलावरील विजेचे दिवे फोडून टाकल्याने आज कित्येक वर्षे येथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर पुलाचा कठडाही तोडण्यात आलेला आहे. कधीकाळी बांधकाम विभागाकडून या पुलाला रंगरंगोटी केली केली. मात्र, महत्त्वाची समस्या असलेल्या विजेकडे कानाडोळा करण्यात आला. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना, आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळ कार्यालयाच्या काही अंतरावर असलेला भाट्ये पूल आणि परिसर अंधाराच्या साम्राज्यापासून कधी मुक्त होणार, याकडे लक्ष लागले आहे.
पर्यटन विकासाला चालना दिल्यास येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सोयीसुविधा शासनाने उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच भाट्ये पूल व परिसरात विद्युतीकरणाकडे शासनाने लक्ष द्यावे. मात्र तसे लक्ष दिले जात नाही.
- फैज अहमद काद्री,
राजिवडा.
भाट्ये, मांडवी किनाऱ्यावर पर्यटन विकास केल्यास आणखी महत्व प्राप्त होईल. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करताना तो आवश्यक असलेल्या ठिकाणी खर्च करावा. पर्यटनस्थळांचा विकास होऊन येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. भाट्ये पूल व परिसराच्या पर्यटन विकास करणे, गरजेचे आहे.
- शेख महंमद हुश्ये,
राजिवडा, रत्नागिरी.