पिकांच्या संरक्षणासाठी पडद्याच्या शेतीचा उपाय
By Admin | Updated: December 5, 2015 23:37 IST2015-12-05T23:36:32+5:302015-12-05T23:37:19+5:30
गुहागर तालुका : शेती वाचविण्यासाठी साड्यांचे, कापडांचे कुंपण करून शेतीभोवती तटबंदी

पिकांच्या संरक्षणासाठी पडद्याच्या शेतीचा उपाय
जावेद शेख / शृंगारतळी
गुहागर तालुक्यात वन्यजीवांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पडद्याची शेती करण्यास सुरूवात केली आहे. शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी पडद्याची तटबंदी उभी करून वन्यप्राण्यांना चकवा देण्याचा प्रयत्न या कल्पनेतून केला जात आहे. मात्र, तरीही वानर प्रजाती या तटबंदीला सहज भेदतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान अजूनही होतच आहे.
तालुक्यात सध्या फळे व पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडे प्रयोगशील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. यामध्ये कलिंगड उत्पादनाबरोबरच विविध पालेभाज्या घेण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करताना दिसत आहेत. यासाठी कृषी विभाचेही मार्गदर्शन लाभत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वांगी, लाल माठ, भेंडी, पावटा, पालक, मुळा, पडवळ, हिरवी मिरची, केळी याचे उत्पादन घेण्याचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे. मात्र, सर्वात अधिक उत्पन्न हे कलिंगड शेतीतून होत असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. या शेतीतून रोजगार निर्मिती बरोबरच हातात पैसा खेळू लागला असल्याने शेतकरीवर्ग वेगवेगळे प्रयोग करू लागला आहे.
मात्र, शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता, कीडरोग या समस्यानांही तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये वन्यजीवांची प्रमुख समस्या शेतकऱ्यांना भेडसावताना दिसत आहे. रानडुक्कर, गवा रेडा, मोकाट जनावरे आणि वानरांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे.
वानर रोप ओरबाडून खात असल्याने खाण्यापेक्षा अधिक नुकसानच जास्त करत आहेत. मोठे शेतकरी यावर उपाय म्हणून नायलॉन धाग्याचा पडदा संरक्षक भिंत म्हणून वापर करत आहेत. तर लहान शेतकरी घरातील जुन्या साडया वापरून शेतीला तटबंदी करत आहेत. शेतातील हिरवे पीक वन्यप्राण्यांच्या नजरेला पडू नये यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. शेती वाचविण्यासाठी ठिकठिकाणी साडयांचे व कापडाचे कुंपण तयार करून तटबंदी करत शेती वाचविण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.