शाळांच्या स्पर्धा होणारच
By Admin | Updated: January 14, 2015 23:37 IST2015-01-14T20:48:28+5:302015-01-14T23:37:39+5:30
शिल्पा सुर्वे : रद्द नव्हे; नियोजन बदलले, शंका निर्माण करु नये

शाळांच्या स्पर्धा होणारच
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे बालदिनानिमित्ताने जे कार्यक़्रम पालिकेच्या २१ शाळांमधून केले जाणार आहेत, त्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन बक्षिसे मिळावीत, हा आपला उद्देश आहे. हा कार्यक्रम रद्द झालेला नाही किंवा एकूण खर्चाच्या रकमेतही कोणता बदल झालेला नाही. त्यामुळे याबाबत शंका किंवा गैरसमज निर्माण करु नये, असे आवाहन समितीच्या सभापती शिल्पा सुर्वे यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
समिती सभापती पदाचा कारभार स्वीकारण्याआधी दुसऱ्या सभापती कार्यरत होत्या. त्यांच्या कालावधीत १४ नोव्हेंबरच्या बालदिनानिमित्ताने पालिकेच्या २१ शाळांसाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले होते. त्यासाठी २१ शाळांमधून तीन शाळांचे क्रमांक काढले जाणार होते. तसेच बक्षिसावर केवळ ३० हजार रुपये खर्च होणार होते. आपण सभापतीपदावर आल्यानंतर सर्वच शाळांना न्याय मिळाला पाहिजे, या उद्देशाने एकूण ३ बक्षिसांऐवजी प्रत्येक शाळेला तीन अशा एकूण ६३ बक्षिसांसाठी नियोजन केले. त्यामुळे ३० हजारऐवजी सुमारे ७० हजारपर्यंत बक्षिसे पालिकेच्या शाळांमध्ये वितरीत होतील. या शाळांना न्याय देण्याचाच हा प्रयत्न आहे. असे असताना हा कार्यक्रम रद्द करण्याचा माझा प्रयत्न आहे, असा आरोप माझ्यावर झाला आहे तो पूर्णत: चुकीचा आहे, असे सुर्वे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी पालिका सभेत जी २ लाख ५६१ रुपयाची रक्कम मंजूर आहे त्या रकमेतच हा कार्यक्रम पूर्ण केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी सर्व शाळांमधून प्रतिसादही लाभत आहे. यापुढील काळातही तो लाभेल, असा विश्वास शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)