लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहराजवळील मिरकरवाडा येथील त्या भूखंडावरील शाळेचे आरक्षण रद्द करून तो भूखंड मत्स्य उद्योगासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला आहे.
आरक्षित भूखंडालगत रासायनिक उद्योग, बर्फ कारखान असून, परिसरात उघडी गटारे आहेत. शिवाय पहिल्या शाळेपासूनचे अंतर कमी असल्याने शाळेचे आरक्षण ठेवता येणार नाही, याबाबत कार्यालयीन अहवाल प्राप्त असून, जिल्हाधिकाऱ्यांचेही मत असल्याने नगर परिषदेच्या विशेष सभेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विशेष सभा झाली. मिरकरवाडा येथील वीस गुंठ्यांच्या या भूखंडावरून सोशल मीडिया तसेच नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, या भूखंडावर चुकीचे आरक्षण टाकल्याने हा वाद निर्माण झाला.
कोकणनगर येथील कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वसाहतीमधील रेखांकनांतर्गत रस्ते, खुल्या जागा व सुविधा भूखंड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत कार्यालयीन अहवालावर निर्णय घेण्याबाबत आजची विशेष सभा बोलावण्यात आली असून, मिरकरवाडा येथील भूखंडांसाठी नसल्याचे नगराध्यक्ष साळवी सांगितले. मात्र, मिरकरवाडा येथील सुरेशकुमार खाडिलकर यांनी याबाबत नगर परिषदेकडे अर्ज केला असल्याने या अर्जावर निर्णय व्हावा, याकरिता विषय पत्रिकेवर हा विषय घेण्यात आला. यामध्ये ज्यांना कोणाला आपली मते मांडायची असतील तर ती मांडावीत. त्याची इतिवृत्तामध्ये नोंद करण्यात येईल, असे सांगितले.
तेव्हा नगरसेवक सुहेल साखरकर यांनी मत्स्य उद्योग व्यवसाय भूखंडावर टाकण्यात आलेले शाळेचे आरक्षण तसेच ठेवावे, असे सांगितले. त्याला नगरसेविका उज्ज्वला शेट्ये, रशिदा गोदड, बंटी कीर, विकास पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे सेनेतच दोन गट पडले. भाजपचे नगरसेवक राजेश तोडणकर आणि मुन्ना चवंडे यांनी मात्र त्याला विरोध केला. उद्योगासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. तेथे रासायनिक कारखाने, बर्फ कारखाने, उघडी गटारे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय पहिल्या शाळेपासून हे अंतर कमी आहे. म्हणून याला विरोध असल्याचे सांगितले. कार्यालयीन अहवालाप्रमाणेच कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.