सुटीच्या दिवशीही शाळा!
By Admin | Updated: April 1, 2015 00:15 IST2015-03-31T21:27:31+5:302015-04-01T00:15:00+5:30
महावीर जयंती : रजा जाहीर झाली पण...

सुटीच्या दिवशीही शाळा!
टेंभ्ये : माध्यमिक शिक्षण विभाग व सर्व संघटना स्तरावर ठरवण्यात येणाऱ्या सुटीच्या नियोजनामध्ये नजरचुकीने महावीर जयंतीची सुटी घ्यावयाची राहून गेल्याने महावीर जयंतीच्या सुटीबाबत जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, महावीर जयंती हा सण असल्याने या दिवशी शालेय कामकाज बंद ठेवावे, असा आदेश जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी दिला आहे.प्रत्येक वर्षी सर्व संघटना प्रतिनिधी व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त सभेत वर्षाचे कामाचे दिवस व सुट्यांचे दिवस निश्चित केले जातात. वर्षामध्ये रविवार वगळता सर्व सुट्यांचे दिवस ७६ पेक्षा अधिक देता येत नाहीत. गतवर्षी महावीर जयंती रविवार दि. १३ एप्रिल रोजी होती. यामुळे सन २०१४-१५ च्या सुट्या निश्चित करताना नजरचुकीने महावीर जयंतीची सुटी धरणे राहुन गेले. प्रत्यक्षात हा राष्ट्रीय सण असल्याने शालेय कामकाज बंद ठेवणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यानी महावीर जयंतीची सुटी जाहीर केली आहे.
महावीर जयंतीची सुटी नियोजित सुट्यांपेक्षा अधिक झाल्याने सर्व सुट्यांचे दिवस ७६ पेक्षा अधिक होत आहेत. शाळा संहितेमधील नियमानुसार हे दिवस ७६ पेक्षा अधिक असता कामा नयेत. यामुळे सुटीचा वाढणारा एक दिवस कमी करण्यासाठी सुटीच्या दिवशी शाळा भरवावी लागणार आहे. यासाठी दि. १२, १९, २६ एप्रिल अथवा ३ मे च्या रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. दि. ६ एप्रिलपासून वार्षिक परीक्षा सुरु होत असल्याने दि. ५ एप्रिलचा रविवार शाळा भरविणे उचीत होणार नाही. याबरोबर एखाद्या शाळेची सुटी शिल्लक असल्यास ती समायोजित करणे शक्य होणार आहे.
महावीर जयंतीदिनी सुटी जाहीर करण्याचा निर्णय यानिमित्ताने अहिरे यांनी घेतला असून, ७६ ऐवजी ७७ सुट्या झाल्याने पेच वाढला होता. (वार्ताहर)
मुख्याध्यापक स्तरावर नियोजन करावे : अहिरे
शालेय कामकाजाच्या दिवसाचे नियोजन मुख्याध्यापक स्तरावरुन करण्यात यावे. शाळेचे सुटीचे दिवस ७६ पेक्षा अधिक होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. यादृष्टीने कार्यवाहीचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.