आंबोलीत भरली बेडकांची शाळा

By Admin | Updated: September 18, 2014 23:29 IST2014-09-18T22:01:20+5:302014-09-18T23:29:34+5:30

निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता : विविध प्रजाती, पर्यटकांचे आकर्षण

A school full of ammunition frogs | आंबोलीत भरली बेडकांची शाळा

आंबोलीत भरली बेडकांची शाळा

महादेव भिसे- आंबोली -आंबोलीत सध्या पावसाळ्यातील बेडकांची शाळा भरली आहे. बेडकांच्या विविध प्रजाती आंबोली परिसरात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे या बेडकांचे छायाचित्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निसर्गप्रेमी व पर्यटक आंबोलीत येत आहेत. बेडकांच्या रुपाकडे पाहून नाक मुरडणाऱ्यांनी एकवेळ आंबोलीत येऊन बेडकांच्या बदलत्या जीवनाला पाहिल्यास त्यातील सांैदर्य त्यांना नक्कीच भावणारे ठरणार आहे.
काहीवेळा बऱ्याच जणांकडून बेडूक म्हटलं की तिरस्कार केला जातो. परंतु खरोखरच बेडूक किती सुंदर असू शकतात, हे जर पहायचे असेल तर लागलीच आंबोली गाठा. आंबोलीत सध्या सेहेचाळीस प्रजातीचे बेडूक जणू शाळा भरल्याप्रमाणे वेगवेगळ्या आवाजामध्ये ओरडताना दिसतील. हिरवा, पोपटी, लाल, पिवळा, सफेद, निळा, काळा, तपकिरी अशा विविध मनमोहक रंगांमध्ये हे बेडूक पहायला मिळतील. अगदी चिंचोक्याच्या आकारापासून ते संपूर्ण हाताच्या पंजापेक्षाही मोठा अशा विविध आकारामध्ये हे बेडूक पहायला मिळतात. मुळात बेडूक म्हटले की, तिरस्कार किंवा कंटाळा करणाऱ्यांसाठी सांगावं असं वाटतं की, बेडूक हे मानव जातीचे मित्र आहेत व त्यांची जीवनचक्रातील भूमिकाही फार मोठी आहे. तसेच ते कधी चावा घेत नाहीत.
आता तुम्ही विचाराल, मानव जातीचे मित्र कसे? तर आपल्या सभोवतालचे धोकादायक किटक, डास, माशांच्या अंड्यापासून ते हारव्यापर्यंत सर्वांचा समूळ नाश करतात. त्यामुळे बेडूक या उभयचराला जीवनचक्रातील साखळीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. ज्यामुळे रोगराई पसरत नाही आणि मानवी आरोग्यासाठी ते लाभदायक ठरते.

बेडकांच्या
गमतीदार प्रजाती
आंबोलीत सध्या मलाबार स्लायडिंग फ्रॉग हा उडणारा बेडूक, डान्सिंग फ्रॉग (मिमिक्री झायलस उत्तराधारी) जो नाच करण्याची नक्कल करतो, कंगॉईड फ्रॉग, दुरंगी बेडूक (बाय कलर फ्रॉग), रानलेला मोरमोराटा, सुरकुत्या बेडूक, आंबोली टोड, आंबोली लिलॉटस या आणि अशा गमतीदार नावांचे बेडूक आंबोलीत सध्या पहायला मिळत आहेत.
छायाचित्रणाची मजा औरच
आता हे बघण्यासाठी काय पाहिजे? तर काहीही नको. पाहिजे ती फक्त तीक्ष्ण नजर आणि अभ्यासू वृत्ती. तसे बघितले तर आपल्या सभोवतालच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर बेडूक बघायला मिळतात. ते बघण्यासाठी पाहिजे फक्त दृष्टी आणि त्यात आपल्याजवळ निरीक्षण क्षमता असेल आणि एखादा चांगला कॅमेरा असेल, तर मग या बेडकांच्या छायाचित्रणाची मजा काही औरच.

वनविभागाने बांधली कृत्रिम तळी
आंबोलीत बेडकांची छायाचित्रे काढण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात. या पर्यटकांना आंबोलीत निसर्ग संवर्धनाचे काम करणारे मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लबचे सदस्य हेमंत ओगले, शुभम आळवे, राजेश देऊलकर हे मार्गदर्शन करत आहेत. या बेडकांच्या संगोपनासाठी आंबोली वनविभागामार्फतही खूप स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. बेडकांच्या अधिवासात वाढ व्हावी, त्यांचे संगोपन होण्यासाठी वन विभागाकडून कृत्रिम तळीही बांधण्यात आली आहे.

Web Title: A school full of ammunition frogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.