प्रशिक्षणासाठी शाळा बंद ?
By Admin | Updated: October 1, 2014 01:07 IST2014-10-01T00:50:33+5:302014-10-01T01:07:00+5:30
निमित्त निवडणुकीचे : एकाच शाळेतील जास्तीत जास्त शिक्षकांची नियुक्ती

प्रशिक्षणासाठी शाळा बंद ?
सागर पाटील / टेंभ्ये
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांबाबतच्या चुकीच्या नियोजनामुळे प्रशिक्षण काळात शाळा बंद ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. काही ठराविक शाळांमधीलच जास्तीत जास्त शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे प्रशिक्षण व निवडणूक काळातील शाळांच्या कामकाजाच्या दिवशी अध्यापन कोणी करायचे, हा प्रश्न शाळासमोर निर्माण झाला आहे.
अनेक शाळांमधून मुख्याध्यापक व एक-दोन शिक्षक सोडून सर्वच शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्याने अशा शाळांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही शाळांमधील एकाही शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही.
सध्या राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक कामासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये विसंगती असल्याने अनेक शाळांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सम प्रमाणात शिक्षक नियुक्त करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अनेक शाळांमधून २८ शिक्षकांपैकी २५, १५ शिक्षकांपैकी १२ अशा प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधाभासात्मक बाब म्हणजे काही शाळांमधून एकाही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे प्रशिक्षण काळात व प्रत्यक्षात निवडणूक काळात शालेय कामकाजादिवशी अध्यापन कोणी करायचे? हा प्रश्न संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ या शाळांवर आली आहे. जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सर्व शाळांमधील शिक्षकांची समप्रमाणात नियुक्ती करावी, यामुळे अध्यापन कार्यात अडथळा येणार नाही. अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे मित्र पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केलेल्या शिक्षक नियुक्तीच्या नियोजनान प्रशासनाने कोणताही बदल केला नसल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त केले जात आहे. सर्व शाळांमधील समप्रमाण शिक्षक नियुक्त करण्यात आले असते, तर विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात होणारे नुकसान टाळता आले असते, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. निवडणूक प्रशिक्षण दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा दि. २८ ते २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. दुसरा टप्पा दि. ४ ते ५ आॅक्टोबर या दरम्यान होणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी दि. १४ ते १६ आॅक्टोबर हे दिवस लागणार आहेत. याच कालावधीत प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहेत. दि. ७ ते १८ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. यामुळे दि. १४ ते १६ आॅक्टोबर रोजी परीक्षा संयोजनामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.