सावंतवाडी बसस्थानकाचे होणार अत्याधुनिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2015 01:29 IST2015-12-23T01:09:21+5:302015-12-23T01:29:30+5:30
शासनाकडून ७ कोटींचा निधी मंजूर : विकसित होणारे जिल्ह्यातील पहिले स्थानक

सावंतवाडी बसस्थानकाचे होणार अत्याधुनिकरण
अनंत जाधव-- सावंतवाडी -राज्य शासनाने सावंतवाडी बसस्थानक अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यासाठी लागणारा सात कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. जिल्ह्यातील पहिले बसस्थानक अशाप्रकारे विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक वर्कशॉप, पुरूष व महिला प्रवाशांसाठी विश्रांतीगृह, वेगवेगळ्या दर्जेदार मशिनरी आदींचा समावेश करण्यात आला असून, अत्याधुनिकरणातून एसटीचे उत्पादन वाढीवरही भर दिला आहे. या बांधकामाला प्राथमिक टप्प्यात शासनाकडून मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्षात हे काम साधारणत: फेब्रुवारी ते मार्चमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन मंडळाच्यावतीने राज्यातील मोक्याची एसटी बसस्थानके अत्याधुनिक पद्धतीने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गमधील सावंतवाडी व कणकवली बसस्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात शासनाने सावंतवाडी बसस्थानक प्राधान्याने अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारा निधीही शासनाने मंजूर केला आहे. याबाबतचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.
यात सावंतवाडी व पूर्वीचे जुने वेंगुर्ले बसस्थानक ही दोन्ही बसस्थानके तब्बल दोन एकर जागेत बांधण्यात आली आहेत. मात्र, शासन सावंतवाडीच्या बसस्थानकाचाच विस्तार करणार आहे. ही तब्बल दीड एकर जागा असून, या जागेत एसटी बसस्थानकाची भव्य इमारत बांधण्यात येणार असून, इमारत बांधत असतानाच शासनाने एसटीच्या उत्पादन वाढीवरही भर दिला आहे. यात दुकान गाळे, विविध हॉटेल्स तसेच अन्य मार्गाने या इमारती भाड्याने देणे आदीच्या माध्यमातून एसटी उत्पादन वाढवणार आहे.
एसटीच्या आराखड्यात बसस्थानकात दर्जेदार वर्कशॉप बांधण्यात येणार आहे. महिला व पुरूष प्रवाशांना बसण्यासाठी स्वतंत्र असे विश्रांतीगृह असणार आहे. दर्जेदार शौचालये, महिला वाहक यांना चेंजिंग रूम आदींची व्यवस्था यामध्ये करण्यात आली असून, या कामाचा परिपूर्ण असा प्रस्ताव तयार करून शासनाची मंजुरी घेण्यात येणार आहे. या प्रत्यक्ष मंजुरीनंतरच कामाला फेबु्रवारी किंवा मार्चमध्ये सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे सावंतवाडी बसस्थानकाला एक वेगळ््या प्रकारची झळाळी येणार असून, जिल्ह्यातील हे पहिले बसस्थानक अत्याधुनिक करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कणकवली बसस्थानकाचा अशाच प्रकारे विस्तार करण्यात येणार आहे.
या बसस्थानकांची कामे स्वत: एसटीचे बांधकाम विभाग करणार असून, अत्याधुनिकीकरणानंतर एसटीचे उत्पादन वाढण्यासही मदत होणार आहे, असा कयास एसटीचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.