सर्वेश, शहनाजच्या कारनाम्यांनी धक्का
By Admin | Updated: November 23, 2015 00:31 IST2015-11-22T21:54:15+5:302015-11-23T00:31:15+5:30
दापोली तालुका : छायाचित्रकार ते ‘फसवणूक’दार

सर्वेश, शहनाजच्या कारनाम्यांनी धक्का
दापोली : प्रसिध्द रेन्बो फोटो स्टुडिओचे मालक नरेंद्र गाडे यांचा पुत्र सर्वेश गाडे व शहनाज भारदे यांच्याविरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्यानंतर सर्वेश गाडे व शहनाज भारदे यांचे अनेक किस्से दापोलीत चर्चेला पुढे येऊ लागले आहेत. प्रसिध्द छायाचित्रकार नरेंद्र गाडे हे मूळचे संगमेश्वर तालुक्यातील काही वर्षापूर्वी पत्नीच्या नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास होते. दापोलीतील प्रसिध्द रेन्बो फोटो स्टुडिओचे मालक म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वेशसुध्दा अल्पावधीतच वडिलांच्या फोटो व्यवसायाकडे वळला. सर्वेश याने आपल्या कलाकुसरीने फोटोशॉपचा वापर करुन अनेक चांगले फोटो काढले. कमी वयातच फोटोग्राफीमध्ये सर्वेशने यश मिळवले.अनेक मॉडेल फोटो त्याने दापोलीत सर्वप्रथम काढले. त्यामुळे सर्वेशबाबत ‘ग्लॅमर’ तयार झाले. त्यातूनच तो मुलींचा लाडका बनला. आई - वडिलांचा एकूलता एक असल्याने कुटुंबाचे प्रेमही त्याला अधिक मिळाले. कमी वयातच फोटोग्राफीमध्ये सर्वेशने उंचीचे शिखर गाठले. परंतु, चुकीचे मित्र त्याला मिळाल्याने सर्वेशचे छंद वाढत गेले. बालपणी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह कार चालवण्याचा विक्रम त्याने केला होता. कोकणचा वायूपुत्र अशी प्रसिध्दी त्याला मिळाली होती. सर्वेशने बालवयात मिळवलेले यश त्याला अधिक काळ टिकवता आले नाही. संगणकात सुध्दा त्याची मास्टरकी होती.संगणक क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षा तो उत्तीर्ण झाला असून, साक्षात मायक्रोसॉॅफ्टचे बिल गेटस् यांनी आपल्याला प्रशंसापत्र पाठवल्याचा दावा त्याने केला होता. परंतु, हा दावासुध्दा खोटा निघाला. असे त्याचे अनेक कारनामे वाढत गेले. प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची त्याची सवय जुनीच आहे. आईची बदली अलिबाग येथे झाल्यानंतर सर्वेशचे कुटुंब पनवेल येथे राहू लागले. आईची दापोलीतून बदली होताच दापोली येथील बंगला विकून गाडे कुटुंबिय पनवेल येथे स्थायिक झाले. पनवेल येथे वडिलांचा फोटो स्टुडिओ आहे. सर्वेश मात्र दापोलीतून गेल्यानंतर एका कंपनीत काम करत होता.दापोली तालुक्यातील सारंग येथील शहनाज अश्रफ भारदे यांची ओळख फोटो व्यवसायातून झाल्यानंतर त्यांची मैत्रीसुध्दा जगजाहीर झाली. विमा एजंट असणाऱ्या भारदे यांचे नावसुध्दा या तक्रारीत असल्याने दापोलीत या दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. ब्रिटनमधील फायनान्स कंपनीमध्ये शरद पवार यांनाही संचालक म्हणून दाखविण्यात आले.
‘एसजीएफएक्स फायनान्शिअल’ या कंपनीशी आपला काहीही संबंध नसल्याची तक्रार शरद पवार यांनी दाखल केल्यानंतर ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या या कंपनीचे संचालक सर्वेश गाडे, शहनाज भारदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
नवा आरोप : पवारांनाच अडकवण्याचा यत्न
शहनाज भारदे व सर्वेश यांनी स्थापन केलेल्या ब्रिटनमधील फायनान्स कंपनीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना संचालक म्हणून घेतले होते. मात्र, यावर पवार यांनी स्पष्टीकरण देताना आपल्याला विचारात न घेता या घोटाळेबाज कंपनीने आपल्याला संचालकपदी दाखवून फसवणूक केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेत दाखल केल्याने सर्वेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तो खोटा मेल
काही वर्षांपूर्वी सर्वेशने आपल्याला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा बिल गेटस् यांनी मेल केला असून, प्रशंसापत्र पाठवल्याचा बनावही रचला होता. त्यानंतर हा मेल खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते.