रेशन दुकानप्रकरणी सरपंच आक्रमक
By Admin | Updated: July 2, 2015 00:28 IST2015-07-01T22:42:27+5:302015-07-02T00:28:58+5:30
प्रतिमा मोरे : तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा...

रेशन दुकानप्रकरणी सरपंच आक्रमक
फुणगूस : पोचरी रेशन दुकान प्रकरण आता तालुका पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे चांगलेच चिघळणार आहे. गेले वर्षभर तुटपुंज्या धान्यासाठी ग्राहकांची चांगलीच परवड सुरु असून, आता तरी गावच्या ठिकाणी धान्य वितरण व्यवस्था सुरु करावी अन्यथा शिधापत्रिका धान्याच्या रोषास पात्र ठरणाऱ्या संबंधित पुरवठा विभाग पुढील परिणामांना जबाबदार असेल, असा इशारा पोचरी सरपंच प्रतिमा मोरे यांनी दिला आहे.संगमेश्वर तालुक्यातील पोचरी, देण, उपळे या तीन गावांतील शिधापत्रिकाधारकांसाठी रेशन दुकान होते. या दुकानाचा ताबा ज्या चालकाकडे होता, त्याच्या मनमानी तसेच वादग्रस्त कारभारामुळे त्रस्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांच्या सततच्या तक्रारींची दखल संबंधित यंत्रणेने घेत त्या दुकान चालकाचा ताबा काढून घेतला. फुणगूस येथील रेशन दुकान चालक कृष्णा सोनू मेणे यांच्याकडे सोपवले. त्यांच्याकडे सध्या दोन रेशन दुकाने असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दोन्ही दुकानांतर्गत येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची परवडही सुरु झाली. दोन्ही दुकानांचा कारभार हाकताना आठवड्यातील ठराविक वार फुणगूस दुकान चालू, तर काही वार पोचरी दुकान चालू अशा चालू-बंद कारभारामुळे वारंवार हेलपाटे मारल्यानंतर धान्य असूनही मिळेनासे झाले आहे.
फुणगूस येथील दुकानाला फुणगूस तसेच कोंड्ये ही दोन गावे जोडली असून, शिधापत्रिकाधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. वेळेवर धान्य न मिळता हेलपाटे नशिबी आल्याने ग्राहक वैतागला आहे. त्यामुळे तक्रारीही वाढू लागल्या. ही बाब संबंधित यंत्रणेने लक्षात घेत नाही. शक्कल लढवत पोचरी येथील धान्य वितरण व्यवस्थाच थेट फुणगूस दुकानातून सुरु केली तर धान्य देण्यासाठी व रॉकेल वितरणसाठी वेगवेगळे वारही ठरवून देण्यात आले. त्यामुळे फुणगूस येथून सुमारे १० ते १२ किमी अंतरावर असलेल्या पोचरी, देण, उपळे येथील लोकांना धान्य व रॉकेल मिळवण्यासाठी दोन वाऱ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे पूर्ण दिवस खर्ची पडतोय. शिवाय पन्नास ते शंभर रुपयांचे धान्य घरापर्यंत नेण्यासाठी एस. टी.ची सोय नसल्याने १५० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. रॉकेल वितरण ठराविक दिवशीच केले जात असल्याने ४० ते ५० रुपयांचे रॉकेल घरापर्यंतत नेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
गेले वर्षभर सुरु असलेली ही परवड थांबवण्यात यावी, याकरिता सरपंच प्रतिमा मोरे तसेच ग्रामस्थांनी तालुका पुरवठा कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्यांना थोड्याच दिवसात जाहीरनामा प्रसिद्ध करुन नवीन दुकानचालकाची नेमणूक करण्यात येईल, असे वारंवार सांगण्यात आले. त्यामुळे या तीनही गावातील लोकांचा संतापाचा पारा चढला आहे. गावच्याच ठिकाणी आमच्या धान्य वितरणची व्यवस्था करावी अन्यथा होणाऱ्या पुढील परिणामांना जबाबदार ठेवत डिंगणी-फुणगूस पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच सरपंच मोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)
पोचरी, देण, उपळे या तीन गावात शिधापत्रिकाधारकांसाठी दुकान.
फुणगूस येथील दुकानाला फुणगूस तसेच कोंड्ये ही दोन गावे जोडली.
शिधापत्रिकाधारकांची संख्याही जास्त.