उपनगराध्यक्षपदी संजय साळवी

By Admin | Updated: November 11, 2014 23:20 IST2014-11-11T23:09:10+5:302014-11-11T23:20:53+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फुटीर गटाचा पाठिंबा

Sanjay Salvi as Deputy Chairman | उपनगराध्यक्षपदी संजय साळवी

उपनगराध्यक्षपदी संजय साळवी

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय साळवी यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीतून बाजूला होत चारजणांनी वेगळा गट करून शहर विकास आघाडी स्थापन केल्याने शिवसेनेला त्याचा फायदा झाला व १७ मते मिळवून साळवी विजयी झाले. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रज्ञा भिडे यांना ११ मते मिळाली.
या पदासाठी संजय साळवी व प्रज्ञा भिडे यांनी नामनिर्देशनपत्र प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांना सादर केल्यानंतर छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. दुपारी १२.४५ वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला.
पालिकेमध्ये शिवसेनेचे १३, भाजपचे ८, राष्ट्रवादीचे ६ व काँग्रेसचा १ असे पक्षीय बलाबल आहे; परंतु राष्ट्रवादीच्या ६ पैकी दत्तात्रय विजय ऊर्फ बाळू साळवी, स्मितल सुरेश पावसकर, प्रीती रवींद्र सुर्वे, मुनीज तन्वीर जमादार या चार नगरसेवकांनी रत्नागिरी शहर विकास आघाडीची स्थापना करून संजय साळवी यांना मतदान केले. त्यामुळे शिवसेना उमेदवार साळवी यांना १७ मते मिळाली.
सुदेश मयेकर, सईद पावसकर व मुनज्जा वस्ता यांची तसेच भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांची मिळून एकूण ११ मते प्रज्ञा भिडे यांना मिळाली. राज्यस्तरावर सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू असून, त्याचे प्रत्यंत्तर रत्नागिरी पालिकेमध्ये दिसून आले. शिवसेनेला उपनगराध्यक्षपदापासून वंचित ठेवण्याचा डाव भाजपने आखला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. भाजपचे ८, राष्ट्रवादीचे ६, काँग्रेसचे १, शिवसेनेतील असंतुष्ट २ अशा १७ नगरसेवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, आमदार उदय सामंत यांचे निकटवर्तीय असलेल्या चार सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून सेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपच्या पदरी निराशा आली. पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावला होता. मात्र, पक्षादेश धुडकावत चार नगरसेवकांनी स्वतंत्र आघाडी केली व सेनेच्या बाजूने मतदान केले. (प्रतिनिधी)

तांत्रिक बाबींमुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी यांना तसे पत्रही सादर करण्यात आले आहे. शहर विकास आघाडीने सेनेला पाठिंबा दिला असल्याचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहर विकासासाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावला होता. मात्र, पक्षादेश धुडकावत चार नगरसेवकांनी स्वतंत्र आघाडी केली व सेनेच्या बाजूने मतदान केले. स्वतंत्र गट स्थापन केला असल्याने याबाबत माहिती घेणार असल्याचे नगरसेवक सुदेश मयेकर यांनी सांगितले.

Web Title: Sanjay Salvi as Deputy Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.