संगमेश्वर तालुक्यात घरातच भरतेय शाळा!

By Admin | Updated: October 2, 2014 00:27 IST2014-10-01T21:34:09+5:302014-10-02T00:27:32+5:30

शिक्षण विभाग : धोकादायक इमारत असल्याने आली वेळ

Sangamesh taluka house filled school! | संगमेश्वर तालुक्यात घरातच भरतेय शाळा!

संगमेश्वर तालुक्यात घरातच भरतेय शाळा!

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन गावातील आदर्श प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनली असून, अखेरची घटका मोजत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गावातीलच एका ग्रामस्थाच्या घरात सध्या हे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला दख्खन शाळा एका घरात भरत आहे.
रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपानजीक दख्खन गाव आहे. गावामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक शाळा आहे. या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. शाळेची इमारत १९६१ साली बांधण्यात आली होती. शाळेमध्ये एकूण तीन वर्गखोल्या असून, मधल्या वर्गखोलीचे वासे मोडल्यामुळे ही वर्गखोली छपराअभावी आहे.
तसेच भिंतीनासुद्धा मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना या शाळेत शिक्षणासाठी पाठवणे धोकादायक असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनीच एका घरामध्ये शाळा भरवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार सद्यस्थितीला रघुनाथ दत्ताराम गुरव यांच्या घरात शाळा भरत असून, सुमारे २५ विद्यार्थी या घरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
रघुनाथ गुरव यांच्या घराच्या पडवीमध्ये इयत्ता पहिली व तिसरी, तर आतील खोलीत इयत्ता दुसरी व चौथीचे विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी बसवले जात आहेत. शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनल्याने ती केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे शाळेच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळावी, यासाठी शाळेच्यावतीने ३० डिसेंबर २०१३ रोजी संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला. यानंतर कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा २७ जून २०१४ रोजी फेरप्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा विचार संबंधित विभाग करतो का, हे पाहावे लागणार आहे. नवीन इमारतीसाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी दिला जात नसल्याचे समजते. त्यामुळे या शाळेच्या नवीन इमारतीला निधी मिळण्याकरिता जिल्हा नियोजन समितीवरच सारे काही अवलंबून आहे. दुसरीकडे विद्यार्थी घरात शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची परवड होत आहे. ही परवड थांबावी व शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)

आदर्श शाळा पुरस्कार पटकावणारी ही शाळा असतानाही त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाने या शाळेच्या दुरवस्थेकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही. छपराअभावी वर्गखोली असतानाही ग्रामस्थांनी सोय केली म्हणून नुकसान टळले. अन्यथा शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही पाहिले नसते, अशीच प्रतिक्रिया आता सामान्यांमधून व्यक्त होत आहे.

शिक्षणाची ऐशीतैशी

Web Title: Sangamesh taluka house filled school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.