आंबेत पुलाखाली वाळू उपसा
By Admin | Updated: July 8, 2014 00:22 IST2014-07-07T23:29:37+5:302014-07-08T00:22:30+5:30
लाईफलाईन संकटात : वाळू उपसा ठरतोय कलहाचे कारण

आंबेत पुलाखाली वाळू उपसा
मंडणगड : तालुक्याची लाईफलाईन असणाऱ्या आंबेत म्हाप्रळ पुलाला वाळूमाफियांकडूनच धोका निर्माण झाला आहे़ म्हाप्रळ खाडीत दिवसागणिक सुरु असलेला वाळू उपसा कलहाचे कारण ठरत आहे.
खाडीपात्राची खोली वाढल्याने आता जवळपास दीडशे फूट खोलीवरही वाळू मिळत नाही़ त्यामुळे वाळूमाफियांना वाळू मिळविण्यासाठी पुलाखालीच संक्शन पंप लावावे लागत आहेत़ याठिकाणी संक्शन लावण्यावरून सोमवारी वाळूमाफियांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
म्हाप्रळ रेती बंदर परिसरात केवळ हातपाटीच्या माध्यमातून वाळू उपसा करण्यास शासनाने सुमारे तीन वर्र्षांपूर्वी परवानगी दिली होती. त्यामुळे संयुक्त रेती गटाच्या पाण्यातील सीमांचा फायदा घेऊन रायगड जिल्ह्यातील रॉयल्टीच्या आधारे म्हाप्रळचा वाळूव्यवसाय उभा आहे. संयुक्त रेती गट असतानाही केवळ रायगडमध्ये हातपाटीला परवानगी देण्यात आल्याने म्हाप्रळमध्ये अनधिकृत वाळू उपशास मोठी चालना मिळाली आहे. वाळू, मजुरांची उपलब्धता व उपशावर होणार एकूण खर्च यांचा विचार करता वाळूमाफियांनी संक्शनवर पूर्णपणे बंदी असतानाही दोन वर्षांपासून त्याचा राजरोसपणे वापर सुरु आहे. यंत्रणेला ‘मॅनेज’ करुन दिवसाही संक्शनव्दारे वाळू उपसा सुरु असतो.
संक्शन खाडी पात्रात शंभर फुटांचा पाईप लावूनही चिखलमिश्रीत वाळू मिळत असल्याने येथील वाळूमाफियाने चक्क मंडणगड-आंबेत पुलाखाली संक्शन लावला. त्याच्या या कृत्यामुळे वाळूमाफियांमध्येच जोरदार भांडण झाले. नंतर हा विषय सारवासारव करुन मिटवण्यात आला. असे असले तरी धोक्याची सूचना देऊनही वाळूमाफियांची नजर आता आंबेत पुलाखाली असलेल्या वाळूकडे गेली आहे. या साऱ्या घटनाक्रमात महसूल विभाग मूग गिळून गप्प बसला आहे़
संक्शनचा वापर पूर्णपणे बेकायदेशीर असतानाही म्हाप्रळ खाडीपात्रात डझनांनी संक्शन पंप पडलेले आहेत़ त्याचा राजरोस वापर होऊनही गत पाच वर्षात महसूल विभागाला एकदाही संक्शनच्या मदतीने वाळू उपसा करणारा एकही गुन्हेगार सापडला नाही.
म्हाप्रळ खाडीपात्रात सुरु असलेल्या बेकायदा संक्शनला अटकाव करण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)