वाळू उपशाला महसूल खात्याचाच आशीर्वाद?
By Admin | Updated: August 12, 2015 23:01 IST2015-08-12T23:01:08+5:302015-08-12T23:01:08+5:30
राजापूर तालुका : विविध खाड्यांमध्ये राजरोसपणे चोरी, कारवाई रखडली

वाळू उपशाला महसूल खात्याचाच आशीर्वाद?
राजापूर : जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपशावर व वाहतुकीवर भरारी पथकाच्या सहाय्याने कारवाई सुरु असताना, राजापूर तालुक्यातील विविध खाड्यांमध्ये राजरोसपणे चालणाऱ्या वाळू उपशाकडे येथील महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून त्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात एकही कारवाई न झाल्याचे उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी एका वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याला मुंबई गोवा महामार्गावर शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना ताजी असतानाच, राजापूर खाडीमध्ये राजरोसपणे मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नेमके साटेलोटे काय? असा सवाल विचारण्यात येत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात तर सहा ते सात वाळू व्यावसायिक एकत्रितपणे मोठया प्रमाणावर राजरोसपणे वाळूचे उत्खनन करत असून, काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी महसुलच्या त्या बडया अधिकाऱ्याने भेट दिली होती. तथापि, बरेच दिवस उलटून गेले तरी कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नसल्याचे पुढे आले आहे.
याच खाडीतून दररोज मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असून, त्याविरुध्द आजवर कुठलीच कारवाई न झाल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. अशीच परिस्थिती तालुक्याच्या अन्य भागातही असून, तेथील नदयांमध्ये व खाडयांमध्ये असाच वाळू उपसा राजरोसपणे सुरु आहे. याबाबत राजापूर तालुका प्रशासनाकडे चौकशीचा प्रयत्न केला असता, आपल्याला यासंदर्भात काहीही माहित नाही असे सांगून कानावर हात ठेवले आहेत. वरिष्ठ अधिकारी याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकारात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावला आहे. (प्रतिनिधी)