रत्नागिरी : उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या समीर गायकवाड याने मानाचा 'महाराष्ट्र श्री ' हा किताब पटकावला. मान्यवरांचे उपस्थितीत सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर नाट्यगृह येथे या स्पर्धा पार पडल्या.गायकवाड याला रोख रुपये ५१००० आणि सन्मानचिन्ह देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सलग दोन दिवस एकूण सहा गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील साडेतीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील स्पर्धा अत्यंत रोमहर्षक झाली. तर ‘महाराष्ट्र किशोर’ हा किताब ईश्वर प्रदीप ढोलम याने पटकावला. ‘महाराष्ट्र उदय’ हा किताब अजिंक्य पवार याने मिळविला. ‘महाराष्ट्र श्रीमान’ किताबासाठी स्वप्नील सुरेश वाघमारे तर महाराष्ट्र फिटनेससाठी, विश्वनाथ पुजारी तसेच महाराष्ट्र कुमार या किताबाकरिता जगन्नाथ जाधव याची निवड झाली. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम २१ हजार आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. दोन्ही दिवस या स्पर्धेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
ठाण्याचा समीर गायकवाड ठरला ‘महाराष्ट्र श्री’ चा मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:33 IST