दापोलीत साडेपाच हजार रोपांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:23 IST2017-07-22T17:23:32+5:302017-07-22T17:23:32+5:30
सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात विक्री

दापोलीत साडेपाच हजार रोपांची विक्री
दापोली : महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात आलेल्या वन महोत्सवानिमित्त नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या झाडांची माहिती देण्यासाठी वन विभागाने आठवडभरात सुमारे साडेपाच हजार रोपांची विक्री केली. यामध्ये सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे वनरक्षक अमित निमकर यांनी सांगितले.
दापोली वन विभागाने रोपे आपल्या दारी ही मोहीम सुरू केली होती. दापोली - हर्णै मार्गावर, तहसील कार्यालयाजवळ माहिती केंद्र उभारण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सुलभपणे रोपे उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. याठिकाणी गेल्या आठ दिवसात साडेपाच हजार रोपांची विक्री झाली.
तालुका वन विभागाच्या या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या रोपे विक्रीतून आलेले उत्पन्न वन विभागाला मिळाले आहे. वृक्षलागवड मोहिमेत शाळा, संस्था आणि नागरिकांना विविध जातीची रोपे शासनाकडून ना नफा ना तोटा तत्त्वावर देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वनपाल मारूती जांभळे, वनरक्षक अमित निमकर, विजय तोडकर, महादेव पाटील आदींनी मेहनत घेतली.