कोकण रेल्वेत गुटख्याची विक्री

By Admin | Updated: November 11, 2014 23:19 IST2014-11-11T21:48:32+5:302014-11-11T23:19:08+5:30

संतापजनक प्रकार : महिला, ज्येष्ठ नाराज

Sale of Gutkha in Konkan Railway | कोकण रेल्वेत गुटख्याची विक्री

कोकण रेल्वेत गुटख्याची विक्री

सुरेश मोरे - कुंभाड -कोकण रेल्वेत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री खुलेआम सुरू आहे़ अनेक तरूण गुटख्याच्या आहारी गेलेले आढळतात. कोकण रेल्वेतील प्रवासादरम्यान या तरूणांना विचारले असता रेल्वेतच चोरून गुटखा विक्री सुरू आहे, असे बेधडकपणे सांगत आहेत. रेल्वे प्रशासन मात्र या सर्व प्रकाराबाबत मौन धारण करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी असाच प्रकार सुरू होता. मात्र, कालांतराने तो कमी झाला होता. आता दिवाळी हंगामादरम्यान या गुटखा विक्रीने जोर धरला आहे. दिवाळी हंगामातील गर्दीचा फायदा घेऊन गाडीमध्ये गर्दीतून वाट काढीत या गुटखा विक्री करणाऱ्यांची चांगली कमाई होत आहे. खेड ते पनवेल तसेच पुन्हा पनवेल ते खेड असे प्रवास करणारे हे गुटखा विक्रेते विनापरवाना गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विकून आपली उपजीविका चालवित आहेत. गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतरही कोकण रेल्वेत गुटखा विक्री करण्यात येत आहे़ या लोकांवर कोणाचा वरदहस्त आहे, याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोकणातून रेल्वेने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत हे विक्रेते राजरोस गुटखा विक्री करतात. हे संतापजनक असून, जे अधिकारी या विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत, त्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारने गुटखा विक्रीवर बंदी आणली. त्यानंतर कारवाई करण्याची मोहीम सुरू झाली. मात्र, तरीही ही विक्री सुरू राहाते याचा अर्थ काय, असा प्रश्न कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ प्रवासीवर्गाने प्रशासनाला विचारला आहे.

चौकशी करण्याची मागणी
रेल्वेत गुटखा विक्री चालते, याची खबर कित्येक वेळा प्रशासनाला नसते. प्रवासी सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. राजरोस विक्रीचा त्रास ज्येष्ठ, महिलावर्गाला होत आहे.

Web Title: Sale of Gutkha in Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.