चिपळूणमध्ये पुन्हा एकदा सदानंद चव्हाण
By Admin | Updated: October 20, 2014 00:53 IST2014-10-19T23:05:32+5:302014-10-20T00:53:38+5:30
विधानसभा निवडणूक : शेखर निकमांचा निसटता पराभव

चिपळूणमध्ये पुन्हा एकदा सदानंद चव्हाण
चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघात दिवाळीपूर्वीच शिवसेनेने जोरदार फटाके फोडले. विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना पुन्हा एकदा मतदारांनी संधी दिली आहे. चिपळूणच्या इतिहासात चव्हाण यांच्या रुपाने तिसऱ्या रुपाला दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळाली आहे. शेखर निकम यांचा निसटता पराभव झाला. त्यांनी तो मान्य केला.
चिपळूण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी आज (रविवारी) सकाळी ८ वाजता गुरुदक्षिणा सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील, वैशाली माने यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उमेदवार सदानंद चव्हाण, शेखर निकम व इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपचे उमेदवार माधव गवळी हे बाराव्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रात दाखल झाले.
पहिल्या फेरीपासूनच सदानंद चव्हाण यांनी आघाडी घेतली. पहिल्या दोन फेरीत सदानंद चव्हाण आघाडीवर होते. तिसऱ्या व चौथ्या फेरीत शेखर निकम यांनी आघाडी घेतली. पुन्हा पाचव्या फेरीपासून आठव्या फेरीपर्यंत चव्हाण आघाडीवर होते. नवव्या, दहाव्या व अकराव्या फेरीअखेर शेखर निकम हे ३२७४ मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर मात्र, चौदाव्या फेरीत पुन्हा निकम यांना आघाडी मिळाली. ही एक फेरीवगळता २३व्या फेरीपर्यंत चव्हाण यांची आघाडी कायम राहिली. अखेर ६ हजार ६८ मतांनी चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणी सुरु असताना आमदार चव्हाण व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम बाजूबाजूला बसले होते. दोघेही नातेवाईक असल्याने आपापसात चर्चा सुरु होती. निकम यांची आघाडी असताना त्यांनी आपली ही आघाडी किरकोळ आहे. चिपळूणमध्ये आपल्याला किमान ८ ते १० हजारांची आघाडी हवी होती. त्यामुळे आपला पराभव निश्चित आहे. ५ ते ६ हजारानी आमदार चव्हाण विजयी होतील, असे सांगितले. पराभव दृष्टीपथात असताना तो पचविण्याचा प्रयत्न निकम यांनी केला. अंतिम टप्प्यात १९व्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर निकम यांनी केंद्र सोडले. (प्रतिनिधी)