एस. टी. यंदा घाट्यात?

By Admin | Updated: September 30, 2015 00:02 IST2015-09-29T21:29:12+5:302015-09-30T00:02:18+5:30

परिवहन महामंडळ : जीवनवाहिनीला गणराय नाही पावला...!

S. T. This year? | एस. टी. यंदा घाट्यात?

एस. टी. यंदा घाट्यात?

रत्नागिरी : गणेशोत्सवाकरिता गावाला आलेल्या मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. गणेशोत्सवासाठी एकूण २००५ जादा गाड्यातून मुंबईकर गावी आले होते. मात्र, आतापर्यंत १३०० जादा गाड्यांव्दारे मुंबईकर मुंबईला रवाना झाले आहेत. गतवर्षी १४३० जादा गाड्या मुंबईला गेल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १३० गाड्या घटल्या आहेत.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, याकरिता २०१३ मध्ये १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी अर्थात् २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजाराचे उत्पन्न लाभले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी एस. टी.ला मिळालेला प्रतिसाद अल्प आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईकर गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी परततो. ग्रामीण भागात वाडीवस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी एस. टी. सोयीस्कर ठरत असल्यामुळे प्रवाशांचा एस. टी.कडे असलेला कल अधिक आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून २००५ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एस. टी. महामंडळाने एका गावातील लोकांसाठी ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जादा गाड्यांव्यतिरिक्त दररोज १०० गाड्या विभागातून मुंबईला रवाना होत आहेत.
गौरी गणपती पूजनापासूनच जादा गाड्यांची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली होती. गतवर्षी १४३० जादा गाड्यांनी मुंबईकर रवाना झाले होते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अधिक गाड्या मुंबईला रवाना होतील, असा विश्वास एस. टी.च्या पदाधिकाऱ्यांना वाटत होता. मात्र, तो फोल ठरला आहे.
गेल्या दोन वर्षी ऐन गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. यावर्षी पाऊसच नसल्यामुळे रेल्वे सुविधा सुरळीत सुरू होती. इतकेच नव्हे, तर रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी खास जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवासीवर्ग रेल्वेकडे आकर्षिला गेला. त्यामुळे यावर्षी एस. टी.ला १३० जादा गाड्यांची तूट आल्याने उत्पन्न घटले आहे. (प्रतिनिधी)

रेल्वेकडे लोकांचा वाढता कल
प्रतिवर्षी एस. टी.ला गणेशोत्सवात एस. टी.ला मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, यंदा अनेक गणेशभक्तांनी रेल्वेची पाऊलवाट पकडली. रेल्वेनेही पुरेशी आणि चांगली सोय केल्याने अनेकांचा प्रवास गर्दीचा झाला असला तरीही सुखकर झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एस. टी.कडे पाठ फिरवली. दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी यंदा त्यामानाने कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना वेळेत घरी पोहोचता आले.

Web Title: S. T. This year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.