एस. टी. करणार रोपांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:21+5:302021-05-25T04:35:21+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे कलमे/ रोपे वाहतूक करण्यासाठी महाकार्गो सेवा उपलब्ध केली आहे. या ...

एस. टी. करणार रोपांची वाहतूक
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे कलमे/ रोपे वाहतूक करण्यासाठी महाकार्गो सेवा उपलब्ध केली आहे. या सेवेंतर्गत नारळ, आंबा, काजू कलमांची एका जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यात येणार आहे़
पावसाळ्यात मृग नक्षत्रात प्राधान्याने लागवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाल्यापासून लागवडीचा कल वाढला आहे. अनेक पडीक जमिनी, ओसाड डोंगरावर बागायती फुलविण्यात आली आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी कोकणातील लाल मातीत विविध उत्पादने घेण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. लागवडीसाठी लागणारी रोपे किंवा कलमे अन्य जिल्ह्यांतून आणावयाची असतात. तसेच आपल्या जिल्ह्यातील नारळ, आंबा, काजू कलमांना अन्य जिल्ह्यांत मागणी होत असल्याने रोपे/कलमे अन्य जिल्ह्यांतून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी किंवा अन्य जिल्ह्यांत पाठविण्यासाठी रत्नागिरी विभागाने महाकार्गो सेवा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरीसह दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आगारात वाहतूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केली आहे.