एस. टी. कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: October 15, 2015 00:45 IST2015-10-14T23:47:44+5:302015-10-15T00:45:39+5:30

कणकवली कार्यशाळा : विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

S. T. Trade union movement | एस. टी. कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

एस. टी. कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

कणकवली : एस. टी. कामगारांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासन तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी एस. टी. कामगार संघटनेच्यावतीने येथील एस.टीच्या विभागीय कार्यशाळेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर धालवलकर, सचिव दिलीप साटम, अनिल नर, विनय राणे, लाड, खवणेकर, विजय गोवेकर, आनंद राणे, मंगेश बापर्डेकर, रवींद्र भिसे, बाळा मालंडकर, प्रवीण कांडरकर, सी. एन. रजपूत यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच उत्पन्न वाढीसाठी संघटनेकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची दखल घेतली जात नाही. निधी अभावी आर्थिक लाभही कर्मचाऱ्यांना दिले जात नाहीत. मध्यवर्ती कार्यशाळेतील वाढीव कामांच्या श्रमिक तासांची मान्यता मिळणे आवश्यक आहे. कराराच्या तरतुदीनुसार काढण्यात आलेल्या परिपत्रकांची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. करारातील त्रुटी व विसंगती दूर करणे गरजेचे आहे. उभयपक्षी मान्य असलेली कैशलेस योजना लागू करण्यात यावी. प्रवाशांना दर्जदार सेवा देण्यासाठी असलेले अडथळे दूर करण्यात यावेत. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काम करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. नियमबाह्य शिक्षा रद्द करण्यात याव्यात. सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात. रिक्त पदे भरण्यात यावित. अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच समस्या न सुटल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.या आंदोलनापूर्वी विभागीय स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभाग नियंत्रकांना नोटीस संघटनेच्यावतीने देण्यात आली होती. या नोटीसीतील मुद्यांवर १0 आॅक्टोबर रोजी चर्चा करण्यात आली. विभाग नियंत्रक चेतन हसबनिस यांनी दखल घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विभाग स्तरावर बुधवारी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर आता २८ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली आहे. (वार्ताहर)


दिलीप साटम : २८ आॅक्टोबरला राज्यस्तरावर आंदोलन
विभागस्तरावर बुधवारी संघटनेच्यावतीने केलेल्या आंदोलनानंतर आता २८ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येणार आह, अशी माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली.

Web Title: S. T. Trade union movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.