एस. टी. कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार, ना वैद्यकीय बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:36+5:302021-09-14T04:37:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अनलाॅकनंतर एस. टी. फेऱ्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात ...

एस. टी. कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार, ना वैद्यकीय बिले
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अनलाॅकनंतर एस. टी. फेऱ्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आल्या. मात्र, दैनंदिन उत्पन्नातून जेमतेम डिझेल खर्च भागविण्यात येत असला तरी कर्मचारी वेतन व अन्य खर्चासाठी महामंडळाकडे पैशाची मागणी करावी लागत आहे.
जुलै, ऑगस्टचे वेतन रखडले असताना, शासनाकडून निधी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात आल्याने दोन महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी कर्मचारी वैद्यकीय बिलाचा प्रश्न अद्याप रेंगाळला आहे. रत्नागिरी विभागातील सहा ते सात महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले रखडली असून त्यासाठी किमान ८० ते ८५ लाखांची आवश्यकता आहे. रत्नागिरी विभागाकडून याची माहिती महामंडळाला देण्यात आली आहे. महामंडळाकडून निधी प्राप्त होताच वैद्यकीय बिलाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
लाखोंची वैद्यकीय बिले रखडली
एस. टी. कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय बिले सादर केल्यानंतर बिलाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासूनची कर्मचाऱ्यांची बिले रखडली असून, किमान ८० ते ८५ लाख रुपये त्यासाठी आवश्यक आहेत. वेतनच दोन महिन्यांनंतर निघत असल्याने वैद्यकीय बिलांसाठी मात्र कर्मचाऱ्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.
बिलांसाठी निधीची मागणी
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दैनंदिन उत्पन्नातून जेमतेम डिझेल खर्च भागत आहे. त्यामुळे कर्मचारी वेतन, स्पेअरपार्टस् खर्च, वैद्यकीय बिले तसेच अन्य खर्चासाठी महामंडळाकडे निधीची मागणी करावी लागते. वैद्यकीय बिलांसाठी महामंडळाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दोन महिन्यांनंतर वेतन
जुलै व ऑगस्टच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता.
शासनाकडून महामंडळाला निधीची उपलब्धता करून दिल्यानंतर कर्मचारी वेतन गणेशोत्सवापूर्वी मिळाले.
दैनंदिन उत्पन्नातून जेमतेम डिझेल खर्च भागत असल्याने स्पेअर पार्टस्, कर्मचारी वेतनाचा प्रश्न भेडसावतो.
वेतनासाठी सात कोटी
दरमहा एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सात कोटींची आवश्यकता भासते. लाॅकडाऊनपूर्वी दैनंदिन ४५०० फेऱ्यांमधून ४८ ते ५० लाख रुपये डिझेलसाठी लागत होते. सध्या ३,५०० फेऱ्या सुरू झाल्या असून, दैनंदिन २५ ते ३० लाखांचे उत्पन्न लाभत आहे. उपलब्ध उत्पन्नातून डिझेल खर्च भागविण्यात येत असल्याने वेतन, वैद्यकीय बिले, अन्य खर्चांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
........................................
कोरोनामुळे एस.टी.ला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आजारपण व त्यासाठी झालेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची बिले सादर करण्यात आली आहेत. परंतु अद्याप बिलांची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे खर्चाची परवड होत आहे. वेतनच वेळेवर होत नसल्याने महामंडळाच्या आर्थिक स्थितीची कल्पना आहे. त्यामुळे प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही.
- सागर जाधव, रत्नागिरी
.....................
उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने डिझेल खर्च भागविणे अवघड झाले आहे. वेतनासाठी महामंडळाकडून निधी घ्यावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराचा खर्च अद्याप मिळालेला नाही. आजारपणाचा खर्च त्यावेळी दुसऱ्यांकडून घेऊन भागविला असला तरी देणी देण्यासाठी आता पैसे नाहीत. अजून किती दिवस प्रतीक्षा करावी.
- प्रशांत पाटील, संगमेश्वर