ग्रामीण शेती कालबाह्य
By Admin | Updated: November 2, 2015 23:59 IST2015-11-02T22:34:14+5:302015-11-02T23:59:47+5:30
समीर जाधव : शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे न परवडणारे

ग्रामीण शेती कालबाह्य
खेड : अलिकडच्या काळात कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षापूर्वी खरिप हंगामात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामात व्यस्त दिसत असत़ मात्र, आता त्याच्या उलट चित्र असून, ते चिंताजनक आहे. काळाच्या ओघात ग्रामीण शेती कालबाह्य झाली असून, याकरीता शेतकऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज येथील प्रथितयश शेतकरी समीर सूर्यकांत जाधव यांनी व्यक्त केली आहे़ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे परवडणार नसल्याने ही शेती करणे आता अशक्य झाल्याचे सांगितले आहे़
दरवर्षी शेती करणाऱ्यांची संख्या घटत असून, शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे़ तरूणवर्गही शेतीमध्ये उतरण्यास तयार नसल्याने काळाच्या ओघात कोकणातील शेतीच कालबाह्य होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. कोकणात अनेक गावातून आई - वडील असेपर्यंतच शेती केली जात आहे. त्यापुढील त्यांची पिढी ही शिकलेली असल्याने शेतीत काम करेल, याची खात्री राहिलेली नाही. त्याशिवाय कोकणातील शेतकरी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अजूनही तयार नसल्याने आपल्याकडील शेती तोट्यातच राहते.़ त्यातच महागाई वाढल्याने शेती करणे अवघड होत चालले आहे. कोकणात अनेकजण स्वत:ची शेती नसल्याने अर्ध्या हिश्शाने शेती करतात़ त्यामुळे तीही आता परवडत नाही. गावागावातून शेतीसाठी मिळणारे मजूरही कमी असून, उपलब्ध मजुरांची मजुरी शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. कष्ट ज्यादा आणि फायद्यापेक्षा तोटाच जास्त हे लक्षात आल्याने बाहेरूनच धान्य विकत घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
एकूणच या सर्वांमधून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोकणातील शेतकरी जोपर्यंत आपल्या पारंपरिक शेतीचा हट्ट सोडत नाहीत तोपर्यंत त्यात सुधारणा होणे शक्य नाही़ शेती ही मागासलेल्या अवस्थेतच राहणार असून, असलेली शेती देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे़ अनेक शेतकऱ्यांनी याबाबत आपली भूमिका प्रकर्षाने मांडली आहे़ यामध्ये त्यांची उदासीनता आणि नकारात्मताच दिसून येत असून, यामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे समीर जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)