योजना राबवून गाव स्वयंपूर्ण करा
By Admin | Updated: November 23, 2015 00:32 IST2015-11-22T21:42:48+5:302015-11-23T00:32:59+5:30
राधाकृष्णन बी. : महिला सरपंच, सदस्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

योजना राबवून गाव स्वयंपूर्ण करा
चिपळूण : महिलांनी शासनाच्या विविध योजना राबवून गाव स्वंयपूर्ण करावे, प्रत्येक कामात स्वत: सहभागी होऊन पुढाकार घ्या व ही चळवळ अधिक घट्ट करा. तसेच शासकीय योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी करुन गावचा विकास साधता येतो. केवळ एकदा प्रशिक्षण घेऊन त्याकडे पाठ न फिरवता सहा - सहा महिन्यांनी पुन्हा त्याची उजळणी झाली पाहिजे तरच महिला स्वयंपूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.
निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत मिरजोळी, समाजवादी महिला सभा व महिला मंडळ, चिपळूण यांच्यातर्फे ग्रामपंचायत सरपंच व महिला सदस्या यांचे मार्गदर्शन शिबिर शनिवारी नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे सुरु झाले.
या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार वृषाली पाटील, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी देशमुख, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलेल्या महिला सरपंच व सदस्यांना आत्मविश्वास यावा व कायद्याची, कामाची परिपूर्ण माहिती व्हावी या दृष्टीकोनातून हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून महिलांना शासकीय योजनांची माहिती करून त्या योजना सक्षमपणे गावात राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना सक्षमपणे काम करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्वाचे ठरणार आहे. या शिबिरासाठी पहिल्या टप्प्यामध्ये चिपळूण तालुक्यातील मिरजोळी, कोंढे, कळवंडे, कालुस्ते, खोपड, वालोपे, पेढे, कळंबस्ते, कापरे, शिरळ, रेहेळ-वैजी, पाचाड, मालघर, निर्व्हाळ, रावळगाव, रामपूर, भिले, केतकी, बिवली, भोम, कापसाळ व पाथर्डी-मिरवणे या २१ गावांची निवड करण्यात आली आहे. या शिबिराला मुंबई युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ संध्या म्हात्रे, विजय भागवत, दिनेश पेडणेकर, पी. पी. केळस्कर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिरजोळीच्या सरपंच कनीज दलवाई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक मंगेश पांचाळ, महिला मंडळ अध्यक्षा सुमती जांभेकर यांनी विशेष प्रयत्न केले. (प्रतिनिधी)््
शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. प्रयत्नशील आहेत. गावोगावी योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. महिलांच्या पुढाकाराने शासकीय योजना अधिक सक्षमपणे राबविणे शक्य होऊ शकते. राजकारणात महिलांचा सहभाग वाढता असल्याने त्यांना शासकीय योजनांची माहिती करून देऊन त्याद्वारे गावोगावी योजना राबविण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळेच महिलांसाठी हे मार्गदर्शन शिबिर महत्वाचे ठरणार आहे.