सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याची अफवा
By Admin | Updated: April 8, 2015 00:31 IST2015-04-07T22:01:08+5:302015-04-08T00:31:40+5:30
शासन निर्णय नाही : व्हॉटस्अॅपच्या अफवेमुळे अनेकांचे धाबे दणाणले!

सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याची अफवा
सागर पाटील - टेंभ्ये -राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० केले असल्याचे वृत्त गेल्या चार दिवसांपासून व्हॉटस्अॅपवर फिरत आहे. या वृत्तामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत, तर काहीजणांना अत्यानंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने याबाबत इतक्या तडकाफडकी निर्णय घेतला जाणार नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.राज्य शासनाने राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६० केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केल्याची माहिती दि. १ एप्रिल रोजी व्हॉटस्अॅपवर टाकण्यात आली. हा हा म्हणता हे वृत्त सर्वत्र पसरले व शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले तर काहींना अत्यानंद झाला. या वृत्तामध्ये पुढे असे नमूद करण्यात आले होते की, जानेवारी २०१५ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तत्काळ प्रभावाने निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने ३९६७ निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. असा उल्लेख असल्याने मुख्याध्यापकपदाची सूत्र स्वीकारलेल्या अनेक नवनिर्वाचित मुख्याध्यापकांना मोठा धक्का बसला. याचवेळी ही बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आपल्याला पुन्हा दोन वर्षे नोकरी करायला मिळणार असल्याने त्यांना अत्यानंद झाला. त्यामुळे एकाच वेळी ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण पाहायला मिळाले.
प्रत्यक्षात मात्र याबाबत शासन स्तरावरुन कोणताही निर्णय झालेला नाही. एका संघटनेशी बोलताना मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविणार असल्याचे केवळ सांगितले असल्याचे समजते. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. परंतु हा निर्णय आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने याबाबत तडकाफडकी निर्णय होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. अशा निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करणे अशक्य आहे.
क्षणभर अनेकजणांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला, हे या वृत्ताने दाखवून दिले. नेटवर्कमध्ये येणाऱ्या बातम्या, शासनस्तरावरील संपर्क क्षेत्र, महत्त्वपूर्ण घटकांबाबत पिकविली जाणारी वृत्त याबाबत आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली असून, निवृत्तीचे वय एका दिवसात ठरणार नाही, हे माहीत असणाऱ्यांचा विश्वास बसावा, हे नवलच मानायला लागेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याचा कोणताही अधिकृत निर्णय नाही. अफवेला बळी पडू नये. हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. अजून याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. शासन निर्णय झाल्यानंतर यावर विश्वास ठेवणे योग्य आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात निर्णय होताच संबंधितांना रितसर कळविण्यात येईल.
- ज्ञानेश्वर कानडे,
राज्य अध्यक्ष,
माध्यमिक अध्यापक संघ