हनुमान जयंतीसाठीही नियमावली जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:52+5:302021-04-25T04:31:52+5:30
रत्नागिरी : हनुमान जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. कोरोनामुळे यावर्षी दि. २७ एप्रिल ...

हनुमान जयंतीसाठीही नियमावली जाहीर
रत्नागिरी : हनुमान जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. कोरोनामुळे यावर्षी दि. २७ एप्रिल रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने घरीच साजरा करावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
कोरोनास्थितीत सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या आदेशानुसार हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. कोरोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, पठण आदींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा केबल नेटवर्क, संकेतस्थळ व फेसबुक या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढू नयेत. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.