सत्ताधाऱ्यांनी महोत्सवाचे आयोजन करावे
By Admin | Updated: December 17, 2015 01:26 IST2015-12-16T23:50:46+5:302015-12-17T01:26:05+5:30
मंदार केणींचे आव्हान : जानेवारी महिन्यात आंदोलनांमधून सरकारला जाब विचारणार

सत्ताधाऱ्यांनी महोत्सवाचे आयोजन करावे
मालवण : पर्यटनाची व्याप्तीचा विचार करता सत्ताधाऱ्यांनी बीच फेस्टिवल सारख्या महोत्सवाचे आयोजन करणे महत्वाचे आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. जनतेच्या अपेक्षा ओळखून सत्ताधाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासारखे लोकहिताचे उपक्रम राबवून दाखवा, असे आव्हान काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिले आहे.
येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत केणी बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य अनिल कांदळकर, बाबू वायंगणकर, अशोक चव्हाण उपस्थित होते. मंदार केणी म्हणाले, गेल्या काही महिन्यात मालवण तालुक्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. समस्यांवर पालकमंत्री, आमदार, खासदार यांचे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यात अनधिकृत बांधकाम, प्रशासनाची जाचक कारवाई, सीआरझेड शिथिलता, मालवण महोत्सव, आरोग्य समस्या अशा अनेक समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.काँग्रेसचे नेते नारायण राणे पालकमंत्री असताना बीच फेस्टिवल, सिंधु महोत्सव आदी उपक्रम व्हायचे. मात्र सध्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत महोत्सवाचे साकारण्यासाठी निधी आणू शकत नाही. शासन विरोधात जानेवारी महिन्यात जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्यावतीने राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने, मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही
देवबाग-तारकर्ली येथील अनधिकृत बांधकामांना प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पालकमंत्री यांचा प्रशासनावर वचक नसल्याने प्रशासन मनमानी कारभार करत आहे. तसेच प्रशासनाकडून वाळू वाहतुकीविरोधात डंपर मालकांवर जाचक कारवाई करून अन्याय केला जात आहे, याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांना सोयर-सुतक नाही, अशी टीका केणी यांनी केली.
आमदार जनतेची दिशाभूल करत आहेत
येथील बंदर जेटीच्या सुशोभिकरणासाठी माजी मुख्यमंत्री राणे यांनी आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. मात्र आमदार नाईक हे आपण चार कोटी मंजूर केले अशी खोटी माहिती देत आहेत. राणे यांच्या नंतर मेरीटाईम बोर्डाकडून एकही रुपयाचा निधी आणण्यात आमदार अपयशी ठरले आहेत. जनतेला भासविण्यासाठी त्यांनी बंदर जेटीची पाहणी केली.
प्रसाद मोरजकर यांच्यावर कारवाई
पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर हे तळगाव सोसायटीत काँग्रेसच्या विरोधात लढले. त्याबाबत त्यांचा अहवाल जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मोरजकर हे काँग्रेसला हानी पोहचवीत असून काँग्रेसच्या कुठच्याही सभेला उपस्थित नसतात. त्यांचे काम पक्षविरोधी असल्याचे केणी यांनी सांगितले.