छप्पर कोसळून तिघे जखमी
By Admin | Updated: July 3, 2016 23:53 IST2016-07-03T23:53:56+5:302016-07-03T23:53:56+5:30
महिला गंभीर : चक्रीवादळाचा तडाखा; हातिवले येथील दुर्घटना

छप्पर कोसळून तिघे जखमी
राजापूर : झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तालुक्यातील हातिवले येथील घराचे छप्पर (पत्रे) अंगावर पडून एक महिला गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. यातील जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, गंभीर दुखापत झालेल्या रूपाली सुभाष रसाळ (वय ३७) यांना अधिक उपचारार्थ रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या चक्रीवादळामध्ये राजापूर तालुक्याच्या काही भागात पडझड झाल्याचा घटना घडल्या आहेत.
गेले दोन-चार दिवस पावसाने चांगलाच जोर घेतलेला असून, शुक्रवारी रात्री राजापूर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. दरम्यान, शनिवारी रात्री तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार चक्रीवादळ झाले. त्यामध्ये हातिवले कातळवाडी येथे तुकाराम सदाशिव कविस्कर यांच्या घराच्या छपराचे सिमेंटचे पत्रे कोसळले. त्यामुळे या घरात भाड्याने राहणाऱ्या तीन कुटुंबांतील अझरुद्दीन गमरुद्दीन खान (१७), साईल सुभाष रसाळ (१३) यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, पाली सुभाष रसाळ (३७) यांच्या पायावर सिमेंट पत्रा पडून गंभीर दुखापत झाली आहे.
अचानक आलेल्या या वादळाचा जोर एवढा जबरदस्त होता की, कविस्कर यांच्या घराचे छप्पर उडण्याबरोबरच भिंतीचे चिरेही खाली पडले आहेत. या घराचे संपूर्ण छप्पर उडाल्याने घरात राहणारी तिन्ही कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.
याच चक्रीवादळामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर शिंदेवाडी येथे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर राजापूर शहरातील आंबेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील मोहन पालकर यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या घरात एकच वृद्ध महिला राहत होती. रविवारी राजापूर तहसील कार्यालयाने त्या वृद्ध महिलेला गहू, तांदूळ व रॉकेल असा प्राथमिक सुविधांचा पुरवठा केला आहे.
तालुक्यातील पडवे भटवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी राजापूर तालुक्यात सरासरी ६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली असून, चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाने तातडीने हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)