हा रस्ता की फुटपाथ?
By Admin | Updated: July 6, 2014 23:54 IST2014-07-06T23:52:15+5:302014-07-06T23:54:52+5:30
पेव्हर ब्लॉक : कामाच्या दर्जाबाबत सुरू झाली चर्चा...

हा रस्ता की फुटपाथ?
उमेश पाटणकर _ रत्नागिरी आठवडा बाजारात एका चौकात पाणी साचते म्हणून बसविण्यात येत असलेले पेव्हर ब्लॉक पाहता हा रस्ता की फुटपाथ? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. पेव्हर ब्लॉकची जाडी पाहता हे काम किती दिवस टिकेल, याबाबत शंकाच आहे.
सांडपाण्याचा निचरा होण्याची योजना शहरात कोलमडलेली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शहरातील असलेली गटारे साफ करणे, पुनर्बांधणी करणे अशा कामांकडे लक्ष देण्याऐवजी रत्नागिरी नगरपरिषदेने ज्या रस्त्यांवर पाणी साठले ते त्या ठिकाणी रस्ते उखडू नयेत म्हणून पेव्हर ब्लॉक बसवण्याची योजना आणली आहे. प्रायोगिकतत्त्वावर रत्नागिरी बसस्थानकमार्गे मिरकरवाडाकडे जाणाऱ्या ८० फुटी रस्त्यावर आठवडा बाजार येथील कै. सतीश साळवी चौकात हे पेव्हर ब्लॉक बसवण्यात येत आहेत. या ब्लॉकचा दर्जा पाहता भररस्त्यात फुटपाथ कशासाठी उभारला जातोय? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. या रस्त्यालगतची सर्व गटारे बुजल्यामुळे पावसाच्या पाण्यासह सर्व सांडपाणी या परिसरात साठून राहाते. त्यामुळे पावसाळ्यात चौकातील डांबरीकरण पूर्णत: उखडते. वारंवार करावे लागणारे डांबरीकरण टाळण्यासाठी गटारांची खोदाई न करताच नगरपरिषदेने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेतला. सध्या हे काम प्रगतीपथावर असून, रस्त्याच्या एका बाजूचे पेव्हर ब्लॉक बसवून झाले आहेत. दोन दिवसांच्या वाहतुकीमध्ये यातील अनेक पेव्हर ब्लॉक उखडले आहेत, तर काही ब्लॉक तुटले आहेत. सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथे जांभ्या दगडाचा भराव करुन रस्त्याची उंची एक फुटाने वाढवण्यात आली आहे. त्यावर काँक्रिटीकरण केले असून, ब्लॉक बसवले जात आहेत. ब्लॉकसाठी क्राँक्रिट बेड न घालता ग्रीड पसरुन सीमेंट पावडर टाकून पेव्हर ब्लॉक बसवले जात आहेत. यामुळे हे पेव्हर ब्लॉक किती दिवस टिकणार हा प्रश्नच आहे.
याबाबत आश्फाक शेख या रिक्षा व्यावसायिकाने सांगितले की, ही केवळ धूळफेक आहे. पाणी साचून रस्ते बाद होतात म्हणून परिसरातील गटारे साफ केली असती तर पाण्याचा प्रश्न सुटला असता. जांभा दगड टाकून केवळ काँक्रिटीकरण केले असते तरी चांगले टिकले असते. फूटपाथसाठी वापरायचे पेव्हर ब्लॉक अवजड वाहतुकीचा दाब किती सहन करणार?
आठवडाबाजारमध्ये करण्यात आलेले पेव्हरब्लॉकचे काम त्याच्या दर्जामुळे चर्चेत आले आहे. या कामाबाबत वाहनचालकांनी व्यक्त केलेली नाराजी बोलकी आहे.
पेव्हर ब्लॉक..
रत्नागिरी नगरपरिषदेने पेव्हर ब्लॉकचे काम हाती घेतले. येथील आठवडा बाजारात चौकात पाणी साठू नये, पाण्याचा निचरा योग्य पध्दत्तीने व्हावा, रस्ते उखडू नयेत यासाठी अशा माध्यमाचा वापर केला जातो. येथे तसाच प्रयत्न केला जात आहे.मात्र या कामाच्या दर्जाबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली . शहरातील पेव्हरब्लॉकचे काम पूर्ण होईल तेव्हा नागरिकांचे समाधान होईल काय असा प्रश्न पडला आहे. सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथे जांभा दगडाचा भराव करून रस्त्याची उंची १ फुटाने वाढविण्यात आली आहे. ब्लॉक बसविण्यात आले असले तरी त्यासाठी काँक्रिट बेड घातले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.