खेडमधील रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण;
By Admin | Updated: July 6, 2014 23:55 IST2014-07-06T23:44:35+5:302014-07-06T23:55:58+5:30
सरकारचा नाकर्तेपणा व उदासिनता

खेडमधील रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण;
श्रीकांत चाळके: खेड, तालुक्यातील प्रमुख मार्गांवरील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत.़सरकारचा नाकर्तेपणा आणि अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्याचीे मागणी होत होती. आता पावसाळा सुरू झाल्याने एकाही रस्त्याचे काम होऊ शकणार नसल्याने रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण लागले आहे.
याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत संघटक पांडुरंग पटवर्धन यांनी रस्त्यांच्या कामाचा दर्जा ठरवणारी यंत्रणाच किडली असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक आंब्रे यांनी दर्जा ठरवणाऱ्या यंत्रणेत प्रतिवर्षी बदल करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, आमदार यांच्यावरच अवलंबून असते. मात्र, एखाद्या विभागातील रस्त्याचे डांबरीकरण करायचे असेल, तर त्या विभागातील ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा तेथील विशिष्ट पक्षाची मतदारांची संख्या विचारात घेऊनच त्या कामाला पसंती दिली जाते.
खेड तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते या भागातील गावांना जोडण्यात आले आहेत़ १९६५ मध्ये निर्मिती झालेल्या या रस्त्यांची चाळण झाली आहे़ ४० वर्षात केवळ दोनवेळा डांबरीकरण केलेल्या या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची ओरड येथील स्थानिकांकडून होत आहे. तसेच या विभागातील दोन प्रमुख पक्षांच्या घुसखोरीमुळे या मार्गावरील रस्ते आपसातील राजकीय वैमनस्यामुळे तसेच पडून राहीले़ या भागातील खाडीपट्टा, कर्जी, संगलट, शिर्शी या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पंधरागाव धामणंद विभागातील रस्ते अनेक वर्षे नादुरूस्त आहेत. गेल्या दोन वर्षांत रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला. आता पाऊस सुरू झाल्याने ही कामे लांबली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट होणार आहे. येथे पाणी नाही, एस. टी. नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत़ रस्ता दुरूस्तीसाठीच्या निधीसाठी राजकीय सलगी वाढविण्यात येते. गावपुढाऱ्यावर बरेच काही चालत असल्याने रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जी झाली ती काही भागात झाली, असे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रस्ते दर्जाहीन होत असल्याने अशी समस्या वारंवार उद्भवते. यासाठी राज्य सरकारचा निधी त्याच ठिकाणी वापरावा, यासाठी प्रयत्न करायला हवेत. राजकीय संघर्षात खेड तालुक्यातील रस्ते सापडले असून, या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. त्यात कोणतेही राजकारण आणू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.
खेड तालुक्यातील पंधरागाव भागातील रस्ते खराब झाले. कित्येक वर्षात रस्ता दुरूस्त झाला की नाही, हे पाहायला लोकप्रतिनिधी इकडे फिरकलेही नाहीत. यावेळी मात्र या रस्त्यांची माहिती वरिष्ठांकडे पाठवली असून, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल.