पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:05+5:302021-09-18T04:35:05+5:30
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत पावसाच्या परतीचा प्रवास विलंबाने हाेत आहे. पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातून परतीचा ...

पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबणार
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत पावसाच्या परतीचा प्रवास विलंबाने हाेत आहे. पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेताे. मात्र, राजस्थानमध्ये अद्याप परतीच्या प्रवासासाठी पाेषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे.
पावसाचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्यावर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पावसाची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे, तर हवामान विभागाने १७ सप्टेंबर ही पावसाची राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित केली हाेती. यापूर्वी राजस्थानातून परतीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मात्र, अद्यापही या भागात परतीच्या प्रवासासाठी पाेषक वातावरण तयार झालेले नाही.
गेल्या दहा वर्षांतील राजस्थानमधील पावसाच्या परतीची वाटचाल पाहता, २०११ मध्ये २३ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला हाेता. त्यानंतर २०१२ मध्ये २४ सप्टेंबर, तर २०१४ मध्ये २३ सप्टेंबर राेजी परतीचा प्रवास सुरू झाला हाेता. २०१७ पासून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू हाेत आहे. २०१९ मध्ये आजपर्यंतच्या सर्वात उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता.
राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर भारतातील इतर भागात परतीच्या प्रवासाला सुरुवात हाेते. चालू माेसमात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नाही. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश असा परतीचा प्रवास सुरू हाेताे. त्यानंतर महाराष्ट्रातून पावसाच्या परतीला सुरुवात हाेते. मात्र, राजस्थानमधून उशिराने परतीचा प्रवास सुरू हाेणार असल्याने महाराष्ट्रातूनही पावसाचा परतीचा प्रवास उशिराने सुरू हाेणार आहे.
----------------
गेल्या दहा वर्षांतील वायव्य भारतातून परतीचा प्रवास
२०११ : २३ सप्टेंबर
२०१२ : २४ सप्टेंबर
२०१३ : ९ सप्टेंबर
२०१४ : २३ सप्टेंबर
२०१५ : ४ सप्टेंबर
२०१६ : १५ सप्टेंबर
२०१७ : २७ सप्टेंबर
२०१८ : २९ सप्टेंबर
२०१९ : ९ ऑक्टोबर
२०२० : २८ सप्टेंबर