निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:38+5:302021-09-02T05:06:38+5:30

रत्नागिरी : विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये (वय ८९) यांचे मंगळवारी दुपारी ...

Retired Judge Bhaskar Shetty passes away | निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे निधन

निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये (वय ८९) यांचे मंगळवारी दुपारी मुंबई येथे निधन झाले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते.

भास्कर शेट्ये यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी कायद्याची परीक्षा देऊन वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगाव, पालघर, पणजी या ठिकाणी अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव म्हणून १० वर्षे कामकाज पाहिले.

विधानसभा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकिंग लोकपाल म्हणून निवड झाली. बँकिंग लोकपाल म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. निवृत्तीनंतर त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य असताना त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केले.

ते न्यायप्रिय व शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहवास लाभला होता. त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाउंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. गेले काही महिने ते मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी श्यामल, मुलगा ॲड. सचिंद्र शेट्ये, अभिजित शेट्ये, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Retired Judge Bhaskar Shetty passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.