आरामबस झाडावर आदळून पाच ठार

By Admin | Updated: September 22, 2014 00:49 IST2014-09-22T00:49:13+5:302014-09-22T00:49:28+5:30

असुर्डेतील दुर्घटना : २७ जखमी, सहाजणांची प्रकृती गंभीर, मृतांमध्ये देवगड तालुक्यातील दोघे

The rest of the bus fell into a tree and killed five | आरामबस झाडावर आदळून पाच ठार

आरामबस झाडावर आदळून पाच ठार

सावर्डे : पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील खासगी आरामबस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील २७ प्रवासी जखमी झाले. यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेनजीकच्या असुर्डे (ता. चिपळूण) गावी घडला.
बसमधील एकूण २७ प्रवाशांपैकी सुनील गंगाराम कांबळे (वय २७, शिपोशी लांजा), सतेज प्रभाकर वेतकर (१७, हळदेवाडी देवगड), महेंद्र महादेव तांबे (३०, राजापूर) व एक अज्ञात प्रवासी असे चारजण जागीच ठार झाले. अज्ञात प्रवाशाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला असून त्यांच्याजवळ ओळख पटू शकेल, अशी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे या इसमाची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे. प्रियांका विनोद वेतकर (४५, तिर्लोट देवगड) यांना गंभीर जखमी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर पहाटे ५.१५ च्या सुमारास हा अपघात घडला. साईपूजा ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच- ४३/ एच २५५९) वरळीहून विजयदुर्गकडे जात होती. सुनील विष्णू टिकम (४७, गिऱ्ये विजयदुर्ग) हा बस चालवीत होता. असुर्डे घाट उतरताना दाट धुके होते. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज येत नव्हता. असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या एका झाडावर जोरदार आदळली. बसचा वेग प्रचंड असल्यामुळे ती डावीकडील पहिल्या आसनापासून शेवटच्या आसनापर्यंत झाडावर घासत गेली.
बसमधील दिलीप तुकाराम पाडाळे (वय ५३, राजापूर), अनिल विठोबा झिमण (२८, जावडे लांजा), अमित जाधव (३०, राजापूर), पंकज तानाजी आतवकर (२५, गोठणे राजापूर), आत्माराम सीताराम वारीक (६२, पडेल देवगड) / पान ७ वर
सलग तिसऱ्या अपघाताने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हादरला...!
सावर्डे : पहाटेच्या वेळी होणारा आक्रोश आणि गगनभेदी किंकाळ्या ऐकून महामार्गानजीकचे ग्रामस्थ धावून आले. गेल्या तीन दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग हादरला आहे. आठवडाभरातील हा चौथा अपघात आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सध्या पहाटेच्या वेळी पडणारे दाट धुके, रस्त्याचा न येणारा अंदाज यामुळे अपघात वाढले आहेत. विशेष म्हणजे सध्या महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ नसतानाही हे अपघात होत आहेत. रविवारी मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक असुर्डे येथे खासगी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात २७जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २१ प्रवासी किरकोळ जखमी असून, त्यामध्ये विनोद सुदाम वेतकर (४८, तिर्लोट देवगड), जगदीश गजानन मयेकर (५२, जैतापूर), दीपक पांडुरंग करंजे (४८, ठाणे), लक्ष्मी प्रभाकर बेटकर (४५, मालवण), प्रशांत तानाजी आतवकर (२३, गोठणे, राजापूर), द्रौपदी करंगुटकर (६०, आंबोळगड राजापूर), शारदा वसंत ठुकरुल (६०, आंबोळगड), तृप्ती दत्तात्रय पावसकर (४८, शिरसे, राजापूर), कुलदीप मधुकर वेतकर (२९, देवगड), बाळा नारायण निंबाळकर (४८, कात्रादेवी, राजापूर), मधुकर सुदाम वेतकर (६५, तिर्लोट देवगड), सचिन भास्कर वेतकर (३२, तिर्लोट देवगड), सूर्यकांत आप्पा भाताडे (४४, भांबेड), वैशाली जनार्दन गिरकर (५५, गिर्ये देवगड), दीपाली दीपक तिरलोटकर (४०, तिर्लोट), नीतेश अशोक मोहिते (२१, शिपोशी), विवेक जनार्दन गिरकर (२४, गिर्ये देवगड), संध्या महेंद्र मयेकर (३७, सांगवे राजापूर), सुमित बबन गिरकर (२३, गिर्ये), आशिष सुनील मोंडे (२१, मोंडपाल देवगड), प्रमिला बबन गिरकर (४५, गिर्ये) यांचा समावेश आहे.
आरवली येथे मालवण - मुंबई एस. टी. दरीत कोसळून अपघात झाला आहे. मानसकोंड येथे शुक्रवारी झालेल्या खासगी आराम गाडीच्या अपघातात दोनजण ठार झाले होते. शनिवारी आगवे पॅसिफिक हॉटेलजवळ पुणे-देवरुख एस. टी. बस दरीत कोसळली होती. त्याच पट्ट्यात आज (रविवारी) आराम बस झाडावर आदळून आणखी पाचजणांचा बळी गेला.
गेल्या आठवडाभरात झालेले चारही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते चिपळूणदरम्यान झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: The rest of the bus fell into a tree and killed five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.