लॉकडाऊनला लोकांकडून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:18+5:302021-04-11T04:30:18+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे, तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ...

लॉकडाऊनला लोकांकडून प्रतिसाद
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे, तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी शनिवार, रविवार हे दोन कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शनिवारी सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान
गुहागर : ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आणि निर्मलक्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथे कलामंचाचे उपाध्यक्ष रमेश भेकरे आणि सचिव रमेश कोकमकर यांनी जैतापकर यांचा सन्मान केला.
कोरोना संसर्ग वाढतोय
रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या तालुक्यात भरमसाठ वाढू लागली आहे. गेल्या चार दिवसांत जवळजवळ २०० रुग्ण सापडले आहेत. अनेक गावांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. सध्या वाढत्या संख्येने तालुकावासीयांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
रक्तदान शिबिर घ्या
चिपळूण : कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही भासत आहे. जिल्हा रुग्णालयाला असलेल्या रक्ताची गरज लक्षात घेऊन युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षाप्रमाणे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून, ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
लांजा : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पीक तारण कर्ज योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून काजू बी व सुपारीला बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम, ६ टक्के व्याजदराने उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उकाड्याने लोक हैराण
देवरुख : सकाळी दाट धुके आणि त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण, दुपारनंतर असह्य उकाडा अशा संमिश्र वातावरणाने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून असे वेगवेगळे वातावरण सुरू झाले आहे.
रस्त्याची धूप
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली येथे एसटी स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाडीचे पाणी येत असल्याने, या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. रस्त्याची तटबंदी कोसळल्यामुळे हे खारे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे खराब झालेला हा रस्ता आणि या ठिकाणी कोसळलेला धक्का, यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे.
अनियमित पाणीपुरवठा
रत्नागिरी : शहरात गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. बुधवारी तिसऱ्या दिवशी जेमतेम अर्धा तास पाणी आले. मात्र, विविध भागांमध्ये आलेले गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे.
वेळेवेर खताचा पुरवठा व्हावा
रत्नागिरी : अवकाळीचा तडाखा आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीतही खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी आवश्यक असणारा खतपुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
नवोदय परीक्षा १६ मे रोजी
देवरुख : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा शनिवार १० एप्रिल रोजी आयोजित केली होती. ही प्रवेश परीक्षा कोरोना संसर्गामुळे आता १६ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बदलाची नोंद घ्यावी, असे या विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.