बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST2021-09-23T04:35:36+5:302021-09-23T04:35:36+5:30
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर नदीत साचलेला मोठ्या प्रमाणात गाळ आणि मोकळ्या जागेत भराव करून केली जाणारी बांधकामे यावर निरंतर ...

बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचा ठराव
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर नदीत साचलेला मोठ्या प्रमाणात गाळ आणि मोकळ्या जागेत भराव करून केली जाणारी बांधकामे यावर निरंतर चर्चा सुरू आहे. असे असतानाच खेर्डी येथे कराड चिपळूण मार्गालगत एका व्यावसायिकाने बेकायदा बांधकाम केले. मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून शासकीय जागेतही अतिक्रमण केले. ग्रामपंचायतीने दिलेली नोटीसही संबंधित व्यावसायिक घेत नाही. त्यामुळे पोलीस फौजफाट्यात येथील झालेले बांधकाम तोडले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चिपळूण शहर व परिसरात २२ व २३ जुलै रोजी महापूर आल्यानंतर हजारो लोकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापूर ओसरल्यानंतर सोशल मीडिया असो वा सामूहिक, सार्वजनिक ठिकाणीही महापुराची कारणे आणि उपाय यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. महापूर येण्यास नदीत साचलेला मोठ्या प्रमाणात गाळदेखील कारणीभूत ठरतो आहे. व्यवसाय करण्यासाठी अनेक ठिकाणी भराव करून बांधकामे करण्यात आली, याचाही फटका पुराचे पाणी भरण्यास होत आहे. चिपळूण-कराड मार्गावर खेर्डीतच एका मार्बल व्यावसायिकाने रस्त्यालगतच सखल भागात मातीचा मोठा भराव करून बांधकाम केले. राष्ट्रीय महामार्ग लगत होणाऱ्या गटारासाठीही पुरेशी जागा सोडलेली नाही. त्याबाबतची परवानगीही ग्रामपंचायतीने दिलेली नाही. त्यामुळे खेर्डी ग्रामपंचायतीचा नुकत्याच झालेल्या मासिक सभेत यावर वादळी चर्चा झाली.
संबंधित मार्बल व्यावसायिकाने केलेले हे बांधकाम बेकायदेशीर आहे. या व्यावसायिकाने शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे झालेले बांधकाम काढण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसात सुरुवात सुरू असलेली अतिवृष्टी व गणेशोत्सवामुळे ग्रामपंचायतीकडून याबाबतची कारवाई झालेली नाही. येत्या काही दिवसांत ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामपंचायतीने संबंधित व्यावसायिकाला नोटीस देण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यावसायिकाकडून स्वीकारली जात नाही. या व्यावसायिकाकडून ग्रामपंचायत ठरावालाही केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कारवाई करण्यावरच भर दिला आहे.
...............
गुहागर विजापूर महामार्गावर खेर्डीच्या हद्दीत रस्त्यालगतच मार्बल व्यावसायिकाने बेकायदा बांधकाम केले. हे बांधकाम काढून टाकण्याचा सर्वानुमते मासिक सभेत झाला होता, गणेशोत्सव कालावधीमुळे यावर कार्यवाही झालेली नव्हती. मात्र येत्या काही दिवसांत पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम काढण्यात येईल.
वृंदा विनय दाते, सरपंच, खेर्डी.