सुकिवली सरपंचपदाचे आरक्षण रखडले
By Admin | Updated: December 10, 2014 23:51 IST2014-12-10T22:23:17+5:302014-12-10T23:51:19+5:30
खेड तालुका : जिल्ह्यातील पहिला प्रकार, प्रशासनाची ढिलाई उघड

सुकिवली सरपंचपदाचे आरक्षण रखडले
खेड : जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्याप्रमाणे उमेदवारी अर्जाची छाननीदेखील झाली आहे. आता गुरूवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. अद्याप खेड तालुक्यातील सुकिवली सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सर्व सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले़ मात्र, सुकिवली ग्रामपंचायतीच्या बाबतीत हा नियम का डावलण्यात आला? याविषयी ग्रामस्थदेखील संभ्रमावस्थेत आहेत. प्रशासनाच्या कारभाराचा मोठा फटका या ग्रामपंचायतीला बसणार आहे़
जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २३ डिसेंबरला होत आहे. त्याकरिता निवडणूक आयोगाचा कार्यक्रमदेखील जाहीर झाला आहे. यामध्ये खेड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सुकिवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला, शिर्शी आणि रजवेल या ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, केवळ सुकिवली ग्रामपंचायतींच्या ९ जागांसाठी तब्बल ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़ यातील प्रभाग क्र. ३मधील देऊळवाडी भागातील एक मागासवर्ग प्रभागाची महिला बिनविरोध निवडून आली आहे.
या जागेकरिता कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने ही बिनविरोध निवड झाली. तालुक्यातील बिनविरोध झालेली ही एकमेव महिला आहे. सध्या ९ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत, तर बहिरवली ग्रामपंचायतीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. चौगुले मोहल्ला ग्रामपंचायातीसाठी ५, शिर्शी ग्रामपंचायतीसाठी १९ आणि रजवेल ग्रामपंचायतीसाठी ६ उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र, अद्याप सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने या उमेदवारांचा पार भ्रमनिरास झाला आहे़
अवघ्या जिल्हाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. मात्र, सुकिवली ग्रामपंचायत याला अपवाद आहे. याबाबत तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना विचारले असता त्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. आरक्षण हे अगोदर जाहीर होणे आवश्यक होते. मात्र, ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकते की काय? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)