मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८८० जादा गाड्यांचे आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:45+5:302021-09-13T04:30:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात १२०० जादा एस.टी. गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या ...

मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८८० जादा गाड्यांचे आरक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात १२०० जादा एस.टी. गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातून ८८० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर (१४ सप्टेंबर) मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे. त्यासाठी गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.
गणेशाेत्सवासाठी मुंबईहून दि. ५ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागातून जादा गाड्या दाखल झाल्या. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून, त्याचेही पालन केले जात आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनापासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १६२९ गाड्या मुंबईला रवाना केल्या होत्या. सध्या ८८० गाड्यांचे आरक्षण झाले असून, गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नियाेजन केलेल्या जादा गाड्यांमध्ये मंडणगड आगारातून ७३, दापोली ११९, खेड ९३, चिपळूण १७८, गुहागर १२४, देवरूख ९०, रत्नागिरी ९९, लांजा ४५, तर राजापूर आगारातून ५९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
------------------------
दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येतात. यावर्षी १२०० गाड्यांनी मुंबईकर आले आहेत. परतीच्या प्रवासासाठी आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८८० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. अजूनही काही प्रवासी पुढील दिवसांचे आरक्षण करत असल्याने गाड्यांची संख्या वाढू शकते.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी