संस्कृती विज्ञानावर आधारित संशोधन
By Admin | Updated: July 19, 2016 00:24 IST2016-07-18T22:47:39+5:302016-07-19T00:24:44+5:30
विश्वेषा मुळ्ये : तिरुपतीमधील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात ‘एमए’चं शिक्षण-वेगळ्या वाटेची तरुण पिढी

संस्कृती विज्ञानावर आधारित संशोधन
मेहरून नाकाडे-- रत्नागिरी --सध्या शिक्षकीपेशाकडे ओढा कमी असला तरी डॉक्टर, इंजिनिअर तसेच स्पर्धा परीक्षांकडे वळणारे विद्यार्थी अधिक आहेत. त्याहूनही काही विद्यार्थी पारंपरिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेगळ्या वाटा चोखाळत आहेत. विश्वेषा मुळ्ये ही रत्नकन्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरूपती येथे ‘एम. ए’. करीत आहे. भारतीय संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. याबाबत संशोधन करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश्य असल्याचे विश्वेषा हिने सांगितले.
सूर्य हा ग्रह आहे, त्याला स्वत:चा आवाज/ध्वनी आहे. तो शोधण्यासाठी नासातर्फे एक उपग्रह तयार करण्यात आला. सूर्याच्या दिशेने तो पाठवला. जसजसा हा उपग्रह सूर्याच्या दिशेने गेला व तो मोडला व जळत गेला. मात्र, त्या उपग्रहाने आवाज टिपला. ‘ओम’ असा आवाज आल्याने नासाला प्रश्न पडला की, भारतीय संस्कृतीला ‘ओम’ हे कसे कळले? सूर्यासारखी ऊर्जा आपल्यात यावी, तेज यावं, यासाठी ‘ओमकार साधना’ केली जाते. परंतु भारतीय संस्कृती विज्ञानावर आधारित असल्याने विविध गोष्टी शोधून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्कृत भाषेचे अध्ययन सुरू केले असल्याचे विश्वेषा हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठांतर्गत नागपूर व मुंबईत संस्कृत महाविद्यालये असताना विश्वेषा हिने थेट विद्यापीठात राहून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरवले. आठवीपासून संस्कृत विषय अभ्यासक्रमात होता. अकरावी व बारावी रत्नागिरीत पूर्ण केल्यानंतर तिने विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास करून प्रवेश मिळवला. पदवी अर्थात् ‘शास्त्री’ पूर्ण झाल्यानंतर ती सध्या एम. ए. ‘आचार्य’ करीत आहे.
भाषेची बोलण्याची व लेखनाची शैली वेगवेगळी आहे. परंतु संस्कृत ही एकमेव भाषा आहे की, जी जशी बोलली जाते तशीच ती लिहिली जाते. संगणकाची बायनरी सिस्टीम संस्कृतवर अवलंबून आहे. त्यामुळे नासामध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू केला आहे. संगणक हा मानवाप्रमाणे विचार करीत नाही, त्यामुळे एकच उच्चार असलेल्या शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. त्यावेळी नेमका कोणता शब्द घ्यावा, असा प्रश्न संगणकापुढे असतो. परंतु संस्कृत भाषा जशी उच्चारली जाते, तशीच लिहिली जाते. त्यामुळे वैज्ञानिक भाषा जगासमोर आणण्यासाठी नासाने संस्कृत भाषेला विशेष महत्व दिले आहे. ब्रिटनमध्ये तर संस्कृत भाषा सक्तीची केली आहे. तिरूपती विद्यापीठात तर भारतीय विद्यार्थ्यांबरोबर भूतान, अमेरिका, नेदरलँड येथील परदेशी विद्यार्थी संस्कृत भाषेचा अभ्यास करीत आहेत.
देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकामध्ये असली तरी प्रत्येक व्यक्ती देशाच्या सीमेवर जाऊन लढत नाही. परंतु देशासाठी आपण काही तरी करावं, ही भावना प्रत्येकामध्ये निश्चित असते. याच भावनेतून संस्कृत भाषेचा अभ्यास करताना वैज्ञानिक दाखले शोधून लोकांपर्यंत आणण्याचा मानस असल्याचे विश्वेषा हिने सांगितले.
‘हरिकोटा’ येथे असलेल्या अंतराळ संशोधन केंद्रासाठीही तरूणांची आवश्यकता आहे. या केंद्राची प्रगती कशी होईल, याकडे तरूणांनी वळणे गरजेचे आहे. संस्कृत ही प्राचीन भाषा असली तरी तिला खालच्या दर्जाचे संबोधले जाते. मात्र, इंजिनिअरिंग, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी जी उपकरणे वापरतात, त्याचा उल्लेख संस्कृतमध्ये आढळतो. त्यामुळे या अभ्यासक्रमांचा संस्कृतशी काय संबंध आहे ? संस्कृत व शास्त्र यांचा संगम अभ्यासक्रमात होणे आवश्यक आहे, असे विश्वेषाला वाटते.
आई - वडिलांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच विश्वेषा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. संस्कृतमध्ये पीएच. डी. मिळवून भारतीय संस्कृती विज्ञानावर आधारित असल्याने विविध गोष्टी शोधण्यासाठी संशोधन करणार आहे.