भरणे ग्रामपंचायत ठरणार प्रतिष्ठेची

By Admin | Updated: April 22, 2015 00:30 IST2015-04-21T22:39:14+5:302015-04-22T00:30:51+5:30

खेड तालुका : राष्ट्रवादीसमोर शिवसेना मनसे युतीचे आव्हान

Reputation will be the Gram Panchayat | भरणे ग्रामपंचायत ठरणार प्रतिष्ठेची

भरणे ग्रामपंचायत ठरणार प्रतिष्ठेची

खेड : खेड तालुक्यातील नगरपंचायत होऊ घातलेल्या भरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. १३ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आमदार संजय कदम यांनी चक्क दोन दिवस मुक्काम ठोकला असून भरणे ग्रामपंचायत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणण्यासाठी चंग बांधला आहे. मात्र, प्रथमच शिवसेना आणि मनसेने या निवडणुकीमध्ये युती करून आमदार संजय कदमांचा हा प्रयत्न हाणून पडण्याचा विडा उचलला आहे.
भरणे ग्रामपंचायतीची बुधवारी निवडणूक होत आहे आणि मनसेबरोबरच संजय कदम यांनीही ही निवडणुक प्रतिष्ठेची केल्याने अवघ्या तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, लोटे आणि आवाशी ग्रामपंचायतीमध्येही सेना आणि मनसे युती असल्याने येथे राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यात येण्णार असल्याची भाकिते वर्तवण्यात येत आहेत.
भरणे ग्रामपंचायत १९८५ ते २००० दरम्यान सलग राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. या ग्रामपांयतीमध्ये पक्षापेक्षा भरणे येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजाराम बैकर यांच्याच गटाचे वर्चस्व होते. त्यांनी सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली आहे तर त्यांच्या पत्नी तेजा बैकर यांनीही ५ वर्षे सरपंचपदावर काम केले आहे. मात्र, २००५ नंतर तत्कालीन आमदार रामदास कदम यांनी या ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकवला आणि तेव्हापासून ही ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात होती.
२०१० मध्ये या ग्रामपंचायतीमधील सेनेचे बरेचसे कार्यकर्ते मनसेत गेले़ आणि सत्तांतर झाले. शिवाय मनसेचे वैभव खेडेकर यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवित या ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे पहिलेवहीले इंजिन घुसवले. रामचंद्र मनवल हे मनसेचे पहिले सरपंच झाले तर सुनील चिले दुसरे सरपंच झाले. मनसेची एकहाती सत्ता असतानाही सेनेने कोणतीही हालचाल केली नव्हती. आता संजय कदम यांनीच ही ग्रामंपचायत केंद्रस्थानी केली आहे. ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने सेना आणि मनसेला एकत्र येण्यावाचून गत्यंतर नव्हते. हे ओळखून ही युती करीत संजय कदम यांच्या भरणे गावातील वर्चस्वालाच सुरूंग लावण्याचा चंग बांधला आहे.
मावळत्या ग्रामपंचायतीमध्ये मनसेची एकहाती सत्ता होती़ मात्र आताच्या निवडणुकीत काय होणार? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या २५ वर्षातील अनुभव आणि सेना मनसेच्या युतीमुळे आमदार असलेल्या संजय कदम यांना भरणे ग्रामपंचायतीची ही निवडणुक तितकीशी सोपी राहीली नाही. गेले दोन दिवस आमदार असलेले संजय कदम यांनी भरणेत मुक्काम ठोकला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Reputation will be the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.