गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी घाट दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:36+5:302021-09-05T04:35:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : गणेशोत्सवासाठी पुणे - पिंपरी चिंचवडमधून लाखो नागरिक कोकणात येतात. त्यांना प्रवासासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव ...

गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी घाट दुरुस्त करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : गणेशोत्सवासाठी पुणे - पिंपरी चिंचवडमधून लाखो नागरिक कोकणात येतात. त्यांना प्रवासासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव रस्ता सोयीस्कर आहे. परंतु, अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास करणे धाेकादायक बनले आहे. गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी घाटातील रस्त्यांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी कोकण विकास महासंघातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही माहिती अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली.
कोकण विकास महासंघाने पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०२० पासून राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी अनेकदा पूर्णत: व अंशत: लॉकडाऊन करण्यात आले. पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बऱ्याचअंशी रुग्णसंख्या कमी झालेली आहे. तसेच अनेकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे अनेकजण यावर्षी गावी येण्याच्या तयारीत आहेत. पुणे - पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील रस्ता सोयीस्कर आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ज्या भागात रस्ता सिमेंटचा आहे, तेथे साईड पट्टीवरील भराव, खडी वाहून गेलेली आहेत. वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघात होण्याची व वाहतूक विस्कळीत होण्याची भीती आहे. यासाठी युध्दपातळीवर रस्ते दुरुस्त करावेत. तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांकडे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, ही अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एक तर पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये लसीचा पुरवठा सुरळीत नाही. लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करावी, की ऑफलाईन लस मिळेल, याबाबत रोजच नागरिकांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी अत्यावश्यक अति तातडीची बाब म्हणून सरकारने भूगाव, घोटावडे, पौड, मुळशी या भागातील शाळा व खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन आतापासूनच सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ऑफलाईन लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशीही मागणी कोकण विकास महासंघातर्फे करण्यात आली आहे.