लांजा तहसीलच्या धोकादायक छताची दुरुस्ती
By Admin | Updated: July 3, 2016 23:43 IST2016-07-03T23:43:05+5:302016-07-03T23:43:05+5:30
बांधकाम विभागाकडून काम : जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेत दुरूस्तीचे तहसीलदारांना दिले आदेश

लांजा तहसीलच्या धोकादायक छताची दुरुस्ती
लांजा : लांजा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या छताचा स्लॅब कोसळत असल्याने कर्मचारीवर्ग व नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ढासळत असलेल्या छताची दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी सकाळी लांजा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील छताचा काही भाग कोसळला तर इतर भाग ढासळत असल्याने तालुक्यातून कामानिमित्ताने येणारे लोक व कार्यालयातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन वावर करत होते. स्लॅब कोसळल्यानंतर या ठिकाणी बाकडे लावून प्रवेश बंद करण्यात आला होता. ‘लोकमत’मधून या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली व तहसीलदारांना ताबडतोब काम करुन घेण्याचे आदेश दिले.
तहसीलदार मारुती कांबळे यांनी बांधकाम विभागाला तत्काळ काम करण्याचे संकेत दिल्यानंतर शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छताची डागडुजी करण्यास तातडीने सुरुवात केली आहे. ‘लोकमत’ ने या धोकादायक भागाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानेच तातडीने या भागाची दुरूस्ती करण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच ‘लोकमत’ चे आभारही मानले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या शासकीय इमारती नादुरुस्त असताना याकामी संबंधित खाते दुर्लक्ष करत असल्याने शासकीय कर्मचारीवर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुम, लांजा पोलीस स्थानकची इमारत आदींची दुरुस्ती होणे गरजेचे असताना दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)