नादुरुस्त पाणी टँकरची दुरूस्ती सुरु

By Admin | Updated: June 26, 2014 00:22 IST2014-06-26T00:21:19+5:302014-06-26T00:22:06+5:30

प्रशासनाला पाणी टँकर असूनही अन्य टँकरचा आधार

Repair of damaged water tankers | नादुरुस्त पाणी टँकरची दुरूस्ती सुरु

नादुरुस्त पाणी टँकरची दुरूस्ती सुरु

चिपळूण : दीड वर्षापूर्वी अपघात झाल्यानंतर बंद असलेला पाणी टँकर दुरुस्तीचे काम वाहन विभागातर्फे हाती घेण्यात आले आहे. टँकर असूनही पाण्यासाठी भाड्याने अन्य टँकर घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला पाणी टँकर असूनही अन्य टँकरचा आधार घ्यावा लागत होता.
नगरपरिषद प्रशासनाकडे दोन अग्निशमन बंब व एक पाण्याची गाडी अशी तीन वाहने तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासाठी २ वाहने अशी एकूण ५ वाहने आहेत. या विभागाचा कार्यभार सांभाळण्यासाठी स्वतंत्र विभाग असून, यासाठी अधिकारीही कार्यरत आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी अपघात झाल्यानंतर बंद पडलेला टँकर नगर परिषद आवारातच उभा आहे.
हा टँकर जुन्या मॉडेलचा असल्यामुळे त्याचे पार्टही मिळणे अवघड होते. पाण्याचा टँकर असूनही नागरिकांना आवश्यक त्यावेळी भाडेतत्त्वावर टँकर घेऊन पाणी पुरवठा करण्याची वेळ नगर प्रशासनाला आली होती.
याबाबत माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनीही संबंधित विभागप्रमुखांवर पाणी टँकर दुरुस्त करण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांच्या सूचनेची वेळीच दखल घेण्यात आली नाही. टँकरच्या दुरुस्तीला विलंब झाला. त्यामुळे नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्यानंतर अखेर संबंधित विभागाला जाग आली. आता नादुरुस्त पाणी टँकरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
यापूर्वीच हा टँकर दुरुस्त झाला असता तर पाणी वाटपासाठी होणारा खर्च वाचला असता, असे काही जागरुक नागरिकांनी सांगितले. मात्र आता पाणीटंचाई संपल्यानंतर हा टँकर दुरुस्त करण्यात आल्याने तो विनावापर पडून राहणार आहे. प्रशासनाच्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Repair of damaged water tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.