नुकसानग्रस्त शाळांची दुरुस्ती रखडली
By Admin | Updated: May 22, 2015 00:12 IST2015-05-21T23:14:00+5:302015-05-22T00:12:41+5:30
राजापूर तालुका : चक्रीवादळाच्या तडाख्याने दिलेल्या जखमा तशाच

नुकसानग्रस्त शाळांची दुरुस्ती रखडली
राजापूर : गेल्या महिन्यात राजापूर तालुक्याला जोरदार दणका देणाऱ्या चक्रीवादळात नुकसान झालेल्या ३३ शाळांची अद्याप दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्यात विद्यार्थी कुठे बसवायचे, असा पेच त्या शाळांपुढे निर्माण झाला आहे. चक्रीवादळात तालुक्यातील ३३ शाळांची पडझड झाली होती. या चक्रीवादळाचा मोठा तडाखा जिल्हा परिषदेच्या शाळांना बसला. तालुक्यातील बहुतांश शाळांमधील कीचनशेडचे पत्रे उडाले होते. त्यामध्ये तळवडे शाळा क्र. १ (१२ हजार ५००), केळवली क्र. २ (१६ हजार ५००), केळवली क्र. ३ (५ हजार), मोरोशी क्र. १ (११ हजार २००), आशिवळे क्र. १ (२ हजार), कारवली क्र. १ (१० हजार), मूर क्र. २ (१० हजार), क्र. ३ (५ हजार), करक क्र. ३ (५ हजार), मोरोशी क्र. २ (९ हजार), केळवली क्र. ७ (२ हजार), मोसम क्र. १ (१६ हजार), जांभवली (२ हजार ५००), विलये क्र. १ (३ हजार), क्र. २ (१० हजार), सौंदळ क्र. २ (१० हजार), गोठणे दोनिवडे क्र. २ (२० हजार), क्र. ५ (५ हजार), ताम्हाने क्र. १ (५ हजार), पन्हळे (१० हजार), कोंड्ये क्र. २ (२ हजार), हातिवले (२ हजार), तळगाव क्र. १ (३ हजार), पन्हळेतर्फ सौंदळ (१० हजार), परुळे क्र. २ (५ हजार), तुळसवडे क्र. १ (५ हजार), कोळंब हायस्कूल (५ हजार) व मूर हायस्कूल (२० हजार) यांचा समावेश आहे. या शाळांच्या दुरुस्तीबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. कोणत्याही परिस्थितीत तो सुरु होईल, अशी शक्यता आहे. या नादुरुस्त शाळांची दुुरुस्ती न झाल्यास विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे, असा पेच शिक्षकांपुढे निर्माण होणार आहे. दरम्यान, तालुक्यातील अन्य नादुरुस्त शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये प्रिंदावन तळगाव शाळा क्र. १, सौंदळ क्र. ३, नाणार मराठी शाळा क्र. ३ यांच्या दुरुस्तीचे प्रस्तावदेखील येथील शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले आहेत. पण त्यालादेखील निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. एकूणच अशा कारभारामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात सापडले आहे. (प्रतिनिधी)