रत्नागिरी गॅसमधून पुन्हा ऊर्जानिर्मिती होणार

By Admin | Updated: January 4, 2015 01:04 IST2015-01-04T01:02:56+5:302015-01-04T01:04:45+5:30

हालचाली सुरू : १५ जानेवारीपासून निर्मिती शक्य

Renewable energy will be generated from Ratnagiri Gas | रत्नागिरी गॅसमधून पुन्हा ऊर्जानिर्मिती होणार

रत्नागिरी गॅसमधून पुन्हा ऊर्जानिर्मिती होणार

संकेत गोयथळे / गुहागर
वर्षभर बंद असणारा रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १५ जानेवारीपर्यंत प्रकल्पातील एका युनिटमधून वीजनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक गॅसची उपलब्धता करणे व तयार वीज कोणाला द्यायची, याबाबत नियोजन सुरू आहे.
महाराष्ट्रातील विजेचे संकट दूर करण्यासाठी बुडीत गेलेल्या एन्रॉन म्हणजेच दाभोळ वीज प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून आॅक्टोबर २००५मध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला आलेल्या अनेक अडचणींवर मात करून हा प्रकल्प चालू झाला. १,९०० मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे.
२०१० ते २०१२ पर्यंत प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून होणारा गॅसपुरवठा कमी होऊ लागल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होत होता. २०१२ व २०१३ मध्ये कमी-अधिक प्रमाणात वीजनिर्मिती होत होती. गोदावरी प्रकल्पातून २६ जानेवारी २०१२ रोजी प्रथम गॅसपुरवठा बंद झाल्याने वीजनिर्मिती बंद करण्यात आली. पुढील वर्षभर गॅस उपलब्ध होईल त्याप्रमाणे वीजनिर्मिती होत होती. डिसेंबर २०१३ला प्रकल्पातून पूर्णपणे वीजनिर्मिती बंद झाली. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्यात आली. अशा स्थितीत वीजनिर्मिती करणाऱ्या पॉवर ब्लॉकमधील इलेक्ट्रिक विभागातील कमी केलेले कर्मचारी काही प्रमाणात पुन्हा नियुक्त करण्यात आले आहेत. डिसेंबर २०१४मध्ये आरजीपीपीएलचे अध्यक्ष गिरीष देशपांडे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन गॅसवर तोडगा म्हणून एलएनजीमध्ये इतर द्रव्ये मिसळून त्याची किंमत कमी करून स्वस्त गॅसवर वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करीत रत्नागिरी गॅस प्रकल्प नव्या जोमाने सुरू होईल, असे संकेत दिले होते. पुढील काही दिवसांतच या प्रकल्पाचे सरव्यवस्थापक म्हणून पूर्वी कार्यरत असलेले एनटीपीसीचे प्रमुख गर्ग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्पाला भेट देणार आहेत.

Web Title: Renewable energy will be generated from Ratnagiri Gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.