‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:28+5:302021-05-23T04:30:28+5:30
कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक ...

‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेमुळे दिलासा
कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक वाढली असतानाच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन महामंडळाकडून ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असून, पणन महामंडळाच्या या विक्री व्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाइनव्दारे हापूसचे ७५ हजार बॉक्स थेट ग्राहकांना विक्री करण्यात आले. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्रीतून कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.
शेतकरी ग्राहकाला शेतमाल विक्री करू शकता येईल, यासाठी थेट विक्री योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळाच्या bs.mfa mb.com संकेतस्थळावर बागायतदार आणि खरेदीदार यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र मागणीसाठी किमान शंभर बॉक्सची अट ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतूकदारांच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वत:च्या गाडीने ग्राहकांपर्यत हापूसचे बॉक्स पोचविण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला.
कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मात्र कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखविण्यात आला. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर प्राप्त होत असून विक्रीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदवली की तातडीने पैसेही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम बुडण्याचा प्रश्न राहत नाही. या पध्दतीमुळे गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झाली होती. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असतानाही गतवर्षीच्या विक्रीपर्यंत पोहचली आहे. वाशीतील फळ बाजारात हापूसचे दर गडगडल्यामुळेच थेट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. अद्याप ग्राहकांकडून मागणी होत असून शेतकऱ्यांकडून ग्राहकांना आंबा पाठविण्यात येत आहे.
गेली दोन वर्षे राज्यांतर्गत विविध जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे आंबा महोत्सव बंद आहेत. आंबा महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. मात्र कोरोनामुळे महोत्सव शक्य नसल्याने पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ साखळी योजना सुरू करण्यात आली. त्यासाठीही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कोट
पणनच्या संकेतस्थळावर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आंब्याचा दर, दर्जाची माहिती ग्राहकाला प्राप्त होत आहे. शिवाय शेतकरीही ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी एकूणच उत्पादन कमी असताना, गतवर्षी एवढा आंबा पाठविण्यात आला आहे. अद्याप ग्राहकांकडची मागणी वाढत असल्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन महामंडळ