गणेशभक्तांना दिलासा

By Admin | Updated: September 24, 2015 23:54 IST2015-09-24T22:53:23+5:302015-09-24T23:54:56+5:30

चिपळूण पोलीस : वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न

Relaxation to the devotees | गणेशभक्तांना दिलासा

गणेशभक्तांना दिलासा

चिपळूण : गणेशोत्सवाच्या काळात चिपळूण शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रित होण्यासाठी स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांनी विशेष परिश्रम घेतल्याने वाहतूक सुरळीत सुरु आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस शहरात कारवाई करत आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जॅमरही लावले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली आहे. पार्किंगसाठीही नागरिकांना सवय लागली आहे. त्यामुळे नागरिकही पोलिसांना सहकार्य करत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांची भूमिका व नागरिकांचे सहकार्य यामुळे वाहतुकीची कोंडी फारशी झाली नाही.
वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी वाहतूक शाखेने नगर परिषदेच्या सहकार्याने २० ठिकाणी सूचना फलक व दिशादर्शक फलक लावले आहेत. रिक्षाचालकांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. पेट्रोलचे दर कमी झाले असतानाही रिक्षाचालक दामदुप्पट भाडे आकारतात. यासाठी उपप्रादेशिक परिवहन खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार दरपत्रकांचा फलक रेल्वेस्टेशन व मध्यवर्ती एस. टी. स्टॅण्ड येथे लावण्यात आले आहेत. त्यानुसारच नागरिकांनी रिक्षा चालकांना भाडे द्यावे. यामुळे रिक्षाचालक व नागरिक यांच्यात वाद न होता संवाद साधला जाईल.
शहरातील रिक्षाचालकांना शिस्त असावी, रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारावी यासाठी रिक्षा चालक व मालकांना गणवेश देण्यात आले आहेत. सध्या रिक्षा चालक- मालक हे गणवेश परिधान करुन व्यवसाय करत आहेत. त्यांना दर रविवारी गणवेश परिधान न करण्याची मुभा देण्यात आली आहे.
बेदरकारपणे वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे, दारु पिऊन वाहन चालविणे, परवाना नसणे, इंडिकेटरचा वापर न करणे, सीट बेल्ट न लावणे आदी अनेक कारणांमुळे वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारु पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या क्वॉलिटी बेकरी ते गुहागर नाका दरम्यान वाहतुकीत कमालीची सुधारणा झाली आहे. एकूणच वाहन चालकांना शिस्त लागून त्यांनी सहकार्य केल्यास कारवाईचा प्रश्नच उरणार नाही असे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात सर्वच रस्त्यांवर गर्दी झाली होती. या काळात नगर परिषद, व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल उपनिरीक्षक परदेशी यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Relaxation to the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.