नऊ वाजता सुरू होते नोंदणी, पाच मिनिटांत फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:51+5:302021-05-12T04:32:51+5:30
रत्नागिरी : सध्या १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या वयोगटातील ...

नऊ वाजता सुरू होते नोंदणी, पाच मिनिटांत फुल्ल
रत्नागिरी : सध्या १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या वयोगटातील अनेक व्यक्तींना शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर साईन इन करताच सर्व केंद्रे हाऊसफुल्ल झाल्याचा मेसेज मिळतो. त्यामुळे काहींना आपला नंबर लागण्यासाठी अगदी आठ दिवसांचा कालावधी घालवावा लागत आहे.
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी २ मेपासून कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. मात्र, नोंदणी केल्यानंतर वेळ आणि कुठल्या केंद्रावर लस घेणार, हे निश्चित करण्यासाठी मात्र, नोंदणी करणाऱ्यांची दमछाक होत आहे. कित्येकांना लाॅग इन केल्यानंतर शेड्युल घेतानाच काही मिनिटातच बुकिंग फुल्ल झाल्याचा मेसेज दिसतो. तसेच काहींना पोर्टलच उपलब्ध होत नाही. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर तारीख असेल त्या दिवशी वेगवेगळ्या वेळेत लाॅग इन करण्यास सांगितले जात असले तरीही, अनेक ‘फुल्ल’च्या मेसेजने त्रस्त्र झाल्याचा अनुभव या वयोगटातील अनेक व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.
लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी कुठलीही वेळ निश्चित करण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही वेळी तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या दिवशी लसीकरण असेल त्यासाठी लाॅग इन करण्याची वेळ दिली जाते. मात्र, लाॅग इन करताच नोंदणी फुल्ल झाल्याचा मेसेज येतो. मी आठ दिवस प्रयत्न करतेय.
- खुशबू प्रधान, लाभार्थी, रत्नागिरी
मला डोस मिळण्यासाठी तशी काही अडचण आली नाही. मी सोमवारी दुपारी ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर लाॅग इन करून केंद्र आणि वेळ निवडली. मंगळवारी मात्र, मला दीड तास रांगेत उभे राहावे लागले. त्यानंतर मला लस मिळाली. मात्र, काहीजणांना ऑनलाईन नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. काहीवेळा पोर्टलच सुरू होत नाही. त्यामुळे कंटाळवाणे होते.
- प्रथमेश भागवत, लाभार्थी, रत्नागिरी
लस घेण्यासाठी माझ्या मित्राने ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानेच माझे नाव, आधार क्रमांक, वय आदी माहिती ऑनलाईन नोंदविली होती. त्यानुसार माझे नाव ज्या केंद्रात आले होते, तिथे जाऊन मी मंगळवारी लस घेतली. काही वेळा लवकर पोर्टल सुरू होत नसल्याने लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. बऱ्याचदा दोन मिनिटातच साईट फुल्ल होते.
- अमेय बने, लाभार्थी, रत्नागिरी
लाॅग इनकरिता कधीही राहा तयार
सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लस दिली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर ज्या दिवशी लस घ्यायची असेल, तर त्यासाठी ठराविक वेळेत लाॅग इन होण्यासाठी मेसेज पाठविला जात आहे. मात्र, हा मेसेज आला तरी लाॅग इन करण्यासाठी थोडासा वेळ जरी गेला तरी, लगेचच साईट फुल्ल होते. त्यामुळे तुम्हाला यासाठी तयारीत राहावे लागते, असे हे लाभार्थी सांगतात.