लाकूडसाठ्याबाबत प्रांताधिकारी गंभीर
By Admin | Updated: July 9, 2015 00:03 IST2015-07-09T00:03:14+5:302015-07-09T00:03:14+5:30
येथील प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी आता लवकरच चौकशी होणार आहे, असे त्यांनी तक्रारदार दळवी यांना लेखी कळविले आहे.

लाकूडसाठ्याबाबत प्रांताधिकारी गंभीर
रत्नागिरी : चाफवली येथील पोलीसपाटलाच्या घराशेजारीच लाकूडसाठा या लोकमतमधील वृत्ताची गंभीर दखल रत्नागिरी - संगमेश्वरचे प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी घेतली असल्याने याबाबत पुढील कारवाई लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चाफवली येथील पोलीसपाटील विजय चाळके यांच्याच घराशेजारी गेला महिनाभर कित्येक ट्रक भरतील, एवढा लाकूडसाठा गोळा करून ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याकडे वनविभागाचे लक्ष गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. चाफवली येथील ग्रामस्थ दीपक दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच तहसीलदार यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर हे वृत्त छायाचित्रासह वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच देवरूख वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चाफवली येथे जाऊन हा लाकूडसाठा ताब्यात घेतला. पुढील कारवाई लवकरच होईल, असे यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, आता जवळजवळ महिना संपत आला तरीही वनविभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांच्याविषयी शंका व्यक्त होत होती. याबाबत लोकमतने पुन्हा आवाज उठवताच येथील प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी आता लवकरच चौकशी होणार आहे, असे त्यांनी तक्रारदार दळवी यांना लेखी कळविले आहे. प्रांताधिकाऱ्यांनीच याबाबत लक्ष घातल्याने याप्रकरणी लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)