पंधरामाड ग्रामस्थांचा स्थलांतराला नकार

By Admin | Updated: July 10, 2016 01:44 IST2016-07-09T23:30:20+5:302016-07-10T01:44:37+5:30

समुद्राला उधाण : स्थलांतर नको, बंधारा बांधून द्या

Refuse to migrate to Pandharam villagers | पंधरामाड ग्रामस्थांचा स्थलांतराला नकार

पंधरामाड ग्रामस्थांचा स्थलांतराला नकार

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या पंधरामाड येथील १४ कुटुबांनी स्थलांतराच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. स्थलांतर करणार नाही, असा चंग पंधरामाड येथील या कुटुंबियांनी केला आहे. यावर स्थलांतर हा पर्याय नव्हे तर बंधारा बांधा, अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
मुरूगवाडा, पंधरामाड परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या मदतीअभावी हाल होत आहेत. या परिसरातील चौदा कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध न करताच स्थलांतरीत होण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. अमावस्येचा उधाणाने जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागाला समुद्री लाटांचा चांगलाच तडाखा बसला होता. याचा सर्वाधिक फटका मिऱ्या, काळबादेवी, मुरूगवाडा व पंधरामाड या परिसराला बसला. त्यामुळे येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांनी पूर्णपणे गिळंकृत केला.
समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पंधरामाड येथील घरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करुन मुरूगवाडा व पंधरामाड येथील १४ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे.
परंतु, या नोटीसला येथील नागरिकांनी केराची टोपली दाखवत स्थलांतराला विरोध केला आहे. यापुढेही दर्श अमावस्या, पोर्णिमेची भरती, आदी उधाणांचा सामना या नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे स्थलांतर हा यावर पर्याय नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने याठिकाणी बंधारा बांधावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
येथील बहुतांशी कुटुंबे ही रापणीतून मिळणाऱ्या मासेमारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे येथून स्थलांतर करून काय करणार? असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. स्थलांतरासाठी पर्यायी जागाही उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे येथून स्थलांतर करणार नाही, असा इशारा आपदग्रस्त १४ कुटुंबांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Refuse to migrate to Pandharam villagers