ऐच्छिक कोरोना तपासणी शुल्कात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:10+5:302021-03-30T04:19:10+5:30
रत्नागिरी : कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले आहे. ...

ऐच्छिक कोरोना तपासणी शुल्कात कपात
रत्नागिरी : कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले आहे. हे तपासणी शुल्क पूर्वी १००० रुपये इतके हाेते. मात्र, ते आता निम्मे करण्यात आल्याने काेेराेना चाचणी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये ऐच्छिक तपासणीशिवाय इतरांचीे मोफत कोरोना तपासणी करण्यात येते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, इतर राज्यात अथवा परदेशात कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच अनेक कंपन्यांकडून अचानकपणे कर्मचाऱ्याला बोलावून घेतले जाते. अशावेळी कोरोना तपासणी करूनच प्रवेश दिला जातो. त्यासाठी कोरोना तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते.
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणी करण्यासाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आल्यास खासगी रुग्णालयांमध्ये खर्च वारेमाप घेत असल्याची ओरड नेहमीच होत असते. मात्र, जिवापेक्षा पैसा महत्त्वाचा नसल्याने काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखो रुपयांचे बिल भरण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनावर मोफत औषधोपचार केले जात आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरुवातीला शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीसाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, हे शुल्क कमी करण्यात येऊन आता ५०० रुपयांवर आणण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत आराेग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीची रक्कम आकारून नियमानुसार पावती देण्यात येते. तसेच तपासणीची रक्कम डिस्ट्रीक्ट टास्क फोर्स कमिटी कोविड फंडाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्याचा अहवाल वेळोवेळी प्रशासनाला सादर करण्यात येतो.
काेट
परदेशात जाणारे आणि ऐच्छिक तपासणी करणाऱ्यांकडूनच कोविड तपासणीची रक्कम घेण्यात येते. संशयित किंवा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांकडून कोणतेही कोविड तपासणीचे शुल्क आकारण्यात येत नाही. तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. संघमित्रा फुले-गावडे,
जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी.